सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
सध्या इंदापूर तालुक्यात मटका खेळणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली आहे. जणू काही तालुक्यात मटक्याचे पेव फुटल्याची सद्यस्थिती आहे.
वास्तविक पाहता मटक्याला कुठलीही अधिकृत परवानगी नाही. परंतु मोबाईलद्वारे ऑनलाईन बुकिंग करून अनेक तरुण मटका खेळत असल्याचे आमच्या पाहणीतून दिसून आले. काही महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यात मटक्याचे एजंट पावती द्वारे बुकिंग करून घेण्यासाठी फिरत होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत एजंट गावोगावी मोबाईलच्या व्हाट्स अप द्वारे किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे आम्हाला आकड़े कळवत रहा. अशी भूमिका घेतल्याने ऑनलाइनद्वारे अनेक तरुण आपल्या आकड्यांची बुकिंग करतात. शेकडो रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत आकड्यांची बुकिंग होत असल्याने रोजचा दैनंदिन व्यवहार मटक्याचा किती असेल याची प्रचिती येणे सुद्धा शक्य नाही. सायंकाळी चार वाजल्यानंतर तर मोबाईल वरती आजचा काय निकाल लागला हे पाहण्यासाठी अनेकांची लगबग सुरू असते. आज काय ओपन आला, पती काही निघाली याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू असते. जर पत्ती किंवा आकडा बसला नसेल तर अनेक जण नाराशातून दारूचे सेवन करण्यासाठी धजावत असल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे. कमिशन द्वारे अनेक ठिकाणी मटक्याचे बुकिंग केली जाते. मटक्याच्या पायी अनेकांचे संसार देशोधडी लागले आहेत. ना अधिकृत परवानगी, मोबाईल द्वारे ऑनलाइन बुकिंग यामुळे पोलिसांना सुद्धा याची माहिती पडत नाही. परंतु पोलीस प्रशासनाने या कामी योग्य ती दखल घेऊन अशा अवैद्य धंद्यांवर बंदी आणली पाहिजे. यातून अनेक तरुणांचे संसार वाचणार आहेत. परंतु आर्थिक मिली भगत यामुळे कोणीच याकडे लक्ष देत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मटका.... झाला तर झटका.... नाहीतर बसेल फटका... असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंदापूर तालुक्यात चार ते पाच ठिकाणी मटक्याची मोठी केंद्रे आहेत. परंतु याकडे कोणीच सोयीस्कर रित्या लक्ष देत नाही. हे मात्र आश्चर्य आहे. मटक्यापायी अनेक जणांचे संसार देशोधडीला लागले असताना शासकीय यंत्रणा मात्र बघायची भूमिका घेत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. नाही कुणाचे भय.... त्याला कुणाचे तरी असते अभय.... हे मात्र तितकेच खरे.