सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नवी मुंबई : गणेश धनावडे
एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना मिळालेल्या माहितीनुसार जुहूमध्ये गुन्हे शाखेने बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
काही बांगलादेशी नागरिक जुहू परिसरात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नियोजन करून तातडीने कारवाई सुरू केली.
बुधवारी पोलिसांनी जुहू परिसरात सापळा रचून बांगलादेशी नागरिकांना अटक केली. सर्व आवश्यक नियमांचे पालन करून पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. यावेळी आरोपींनी आपण भारताचे नागरिक असल्याचा दावा केला. मात्र, त्यांचा दावा हा खोटा असल्याने पोलिसांनी काही मिनिटांमध्ये सिद्ध केलं. पोलिसांनी सर्वांना राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितले. आरोपींना राष्ट्रगीत गाता येत नसताना पोलिसांनी त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. चौकशी आणि तपासादरम्यान चौघांकडे कोणतेही भारतीय कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी अटक केलेल्या चार बांगलादेशींची ओळख पटली आहे. पोप्पी टिटू हुसैन (३० वर्षे, महिला), मोहम्मद तट्टू सोफिउद्दीन हुसैन (२५ वर्षे), नूर इस्लाम मकबूल (५५ वर्षे), फैसल बिकू मुल्ला शेख (३१ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. या चौघांविरुद्ध जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.