सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिरस : विजय पवार
रोजचा व्यायाम करायला जाणाऱ्या तिघांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. 9) पहाटे सहाच्या दरम्यान माळशिरस-अकलूज रोडवर देव वकील वस्तीनजीक हा अपघात झाला.
याबाबत अज्ञात वाहनाविरोधात चैतन्य मल्हारी सर्जे यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगदेव किसन सर्जे (वय 55, रा. 61 फाटा, माळशिरस) व शंकर बळीबा देशमुख (वय 46, रा. 61 फाटा, माळशिरस) हे दोघेजण माळशिरस-अकलूज रोडवर दैनंदिन व्यायामासाठी जात असत. हे दोघेही गुरुवारी व्यायामासाठी जात होते.
दिलीप पंढरी कांबळे (वय 45, रा. नेवरे, ता. माळशिरस) हे पायी चालत निघाले होते. सकाळी हे तिघेही माळशिरसकडून अकलूजकडे चालत निघाले असता माळशिरसकडून अकलूजकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या तिघांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात चांगदेव सर्जे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने व दिलीप कांबळे यांच्या पोटावरून वाहनाचे चाक गेल्याने रक्तस्त्राव होऊन हे दोघेही जागेवरच ठार झाले.
शंकर देशमुख हे गंभीर जखमी आहेत. अकलूज येथील खासगी दवाखान्यात ते उपचार घेत आहेत. याच रोडवरून दिलीप कांबळे हा पायी चालत चालला होता. त्याच्या बॅगेमध्ये आधार कार्ड मिळाले आहे. त्या आधार कार्डवर दिलीप कांबळे असे नाव आढळून आल्याने त्याची ओळख पटली आहे. माळशिरस पोलिसांनी अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर हे पुढील तपास करीत आहेत.