Baramati News l विजय लकडे l बारामती डेपोच्या तीस बस पुण्यात राजकीय नेत्याच्या कार्यक्रमासाठी : दहावी- बारावीच्या पेपरला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ... काळी-पिवळी वडाप विद्यार्थीसाठी ठरली देवदूत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
सध्या दहावी बारावीच्या परीक्षांचा काळ चालू असतानाच आज नीरा बस स्थानकावरून सकाळी सव्वाआठ वाजल्यानंतर त्यापुढील दिड तासात एकही एसटी बस बारामतीच्या दिशेने जाणारी उपलब्ध झाली नसल्याने सोमेश्वर येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
          आज दि.२२ रोजी नीरा बस स्थानकावर सोमेश्वर येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी सव्वाआठ वाजल्यापासून सुमारे दिड तास एकही एसटी बस उपलब्ध झाली नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर कसे पोहचायचे याचा प्रश्न पडला. यावेळेस अनेक विद्यार्थ्यांनी बसस्थानकावर उपस्थितीत प्रवाशांच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशी संपर्क साधून बोलावून घेतले तर काही विद्यार्थ्यांनी वडाप जीपचा सहारा घेत परीक्षा केंद्र गाठण्याचा प्रयत्न केला. बरेचशा पालकांनी आज विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडताना रस्त्यावर बस साठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना लिफ्ट देत परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात मदत केल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षेसाठी पोहचता आले. 

याबाबत नीरा बसस्थानकात चौकशी केली असता नऊ वाजताच्या दरम्यान नीरा येथून बारामती असा मार्ग असणाऱ्या एका नीरा बारामती गाडीचा बारामतीहून नीरा येथे येत असताना सोमेश्वर येथील परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाच्या समोरच तांत्रीक बिघाड झाल्यामुळे ती नीरा पर्यंत येवूच शकली नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली असल्याचे सांगण्यात आले.

चौकट:
मागील काही दिवसांपूर्वीच एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्याबद्दल राज्य सरकारने आपली पाठ थोपटून घेतलीय. मात्र ऐन परिक्षेच्या काळात बारामती डेपोच्या सुमारे तीस बस पुण्यात एका राजकीय नेत्याच्या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आल्या असल्याने पुरेशा बस अभावी विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येवू शकते. एसटी महामंडळाच्या ठिसाळ नियोजन व गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले तर याची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व्यक्त होत आहे.
To Top