सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचं जीवन एक शेतकरीच जाणू शकतो. महावितरणच्या लाईटच्या वेळेनुसार शेतकऱ्यांचा दिनक्रम सुरु होतो. शेतीसाठी रात्रीची वीज दिल्याने पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. बारामती तालुक्यातील मुरूम येथील अनिकेत फरांदे या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्याच मुलाने या सर्व अडचणीची 'दारं' नावाची शॉर्टफिल्म बनवली आणि या अडचणी 'दारं' शॉर्टफिल्म मधून मांडल्या आहेत.
या शॉर्टफिल्मला 'अजिंठा फिल्म सोसायटी आणि देवगिरी चित्र साधना' यांच्या वतीने 'बेस्ट शॉर्टफिल्म' पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय अन्य पाच पुरस्कारही या शॉर्टफिल्ममधील कामगिरीसाठी प्राप्त झाले आहेत. जळगाव येथे नुकताच चौथा 'देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल' पार पडला. फेस्टिवलमधे "फायनल ड्राफ्ट फिल्म प्रोडक्शन" आणि "कातळ चित्र" निर्मित आणि अनिकेत फरांदे दिग्दर्शित "दारं" या शॉर्ट फिल्म पुरस्कारास पात्र ठरली. याशिवाय अनिकेत फरांदे यांना 'बेस्ट डिरेक्शन' अनिकेत फरांदे व 'बेस्ट स्क्रीनप्ले' असे दोन पुरस्कार मिळाले.
अर्चना चैतन्य साळुंके यांना 'बेस्ट एडिटिंग' तर देवा आव्हाड यांना 'बेस्ट डीआय' असे पुरस्कार मिळाले. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व 'ख्वाडा'चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या शॉर्टफिल्ममध्ये शेतीला केवळ आठ तास वीज तीही रात्रीची आणि सतत ये-जा करणारीच मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबास काय भोगावे लागते याची व्यथा मांडली आहे. बारामती व पुरंदर तालुक्यातील कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. सोरटेवाडी विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी लिंबरकर, मलसिद्ध देशमुख, ज्ञानेश्वर वावरे, सोनाली घाडगे, संतोष गार्डी, राजू बडदे, संतोष शेंडकर, प्रकाश जाधव, विकास पवार, बाबू वैरागी आदींचा यात समावेश आहे.
याव्यतिरिक्त लातूरच्या 'अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवल' चाही या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट सोशल फिल्मचा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्या हस्ते मिळाला होता. शॉर्टफिल्ममध्ये मंदार कमलापूरकर यांनी साऊंड डिझाईन व चैतन्य साळुंके यांनी छायांकन केले. किरण आळंदीकर, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. विद्यानंद भिलारे यांनी फिल्मसाठी सहकार्य केले.