सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अर्थात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला तालुक्याच्या पश्चिम भागात भागदाड पडण्याची शक्यता आहे. पश्चिम भागातील एका मातब्बर नेते व अनेक गावचे सरपंच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
या प्रवेश प्रक्रियेसाठी बारामतीचा एक नगरसेवक यांनी पुढाकार घेतल्याची माहिती 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती लागली आहे. या पक्षप्रवेशाची तारीख जरी अद्याप समजू शकली नसली तरी, 23 फेब्रुवारी च्या दरम्यान वरील नेत्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत आम्ही तालुक्याच्या पश्चिम भागातील एक सरपंच यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांना विचारले, आपण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहेत. त्यावेळी त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वास्तविक पाहता आम्ही सत्तेच्या विरोधात असल्याने आमच्या गावांना विकास निधी येत नाही. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्राथमिक पातळीवर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र पूर्ण उलघडा त्यांनी केला नाही. त्यांनी मात्र एक सांगितले की, तालुक्याच्या पश्चिम भागातील भिगवन परिसरातील एक नेते हे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाला मोठा धक्का मानला जातो. आगामी काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच धर्तीवर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय पाटील यांना किती त्रासदायक ठरतो की यावरती पाटील मात करतात हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट या पक्षामध्ये प्रवेश केला. वास्तविक पाहता शरद पवारांची ज्यांना साथ असते तोच उमेदवार इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतो. हे आजपर्यंत दिसून आले आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे साहजिकच कार्यकर्ते खचलेले दिसतात. अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले की, सत्ता असेल तर विकास होतो. आम्ही सत्तेचे विरोधात असल्याने आमच्या गावांना विकास निधी मिळत नाही. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा लक्ष देत नाहीत. एवढी मात्र खरे आहे की, जोपर्यंत तालुक्याच्या पश्चिम भागातील एक मातब्बर नेते व काही गावचे सरपंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नाहीत तोपर्यंत मात्र काही सांगता येत नाही. राजकारणात काहीही घडू शकते.... हे मात्र तितकेच खरे.