सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
पुणे, सोलापूर व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांना वरदायिनी ठरलेले उजनी धरणातून आज सकाळी 9:15 भीमा नदी पात्रात पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा येथील नगरपालिका, तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी १६०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उजनी धरणातून पाणी सोडले जात असल्याचा आरोप इंदापूर तालुक्यातील उजनीच्या पाणलोट लगतच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरून पुन्हा एकदा पुणे जिल्हा विरुद्ध सोलापूर जिल्हा असा रणकंद पेटण्याची शक्यता आहे. उजनी धरणाची निर्मिती जरी सोलापूर जिल्ह्यात असली तरी, संपूर्ण पाणलोट क्षेत्र मात्र इंदापूर तालुक्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या नावाखाली उजनी धरणातून पाणी सोडून आमची अवहेलना होत असल्याची प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील उजनीतलगतचा शेतकरी हवादील झाला आहे. आम्ही उजनी धरणाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाली. त्यामुळे उजनी जलाशयाला यशवंत सागर असे संबोधले जाते. याबाबत आम्ही उजनी धरणग्रस्त इंदापूर तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, वास्तविक पाहता कुठल्याही धरणातून पिण्याच्या नावाखाली पाणी सोडले जात नाही. फक्त उजनी धरणातून हे पाणी सोडले जात आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी पिण्यासाठी पाणी देण्यास आमची हरकत नाही. परंतु सोलापूर महानगरपालिका, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा या नगरपालिकांना समांतर जलवाहिनी टाकून पाणी देण्यात यावी अशी मागणी केली होती. उजनी धरणाच्या निर्मिती वेळी आम्ही आमच्या जमिनी दिल्या. भूमिहीन झालो. काही जमिनीवरती आमचा उदरनिर्वाह चालू आहे. असे असताना आमच्या हक्काचे पाणी राखीव ठेवले पाहिजे. तसेच साठ टीएमसी पाण्याची वेग नियोजन करण्याची गरज आहे. असेही त्यांनी नमूद केले. सन 2017 च्या लवाजाच्या निर्णयानुसार दिलेल्या निर्णयाला शासनाने केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप जगताप यांनी केला. उजनी धरणाच्या पाण्यावरती ज्या तालुक्यांची शेती अवलंबून आहे, अशा दौंड, इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सुद्धा त्यांनी व्यक्त केले. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी पातळीत घट होणार हे निश्चित आहे. परंतु सतत पिण्याच्या नावाखाली सोलापूरला भीमा नदीपात्रातून पाणी सोडले जात असल्याने नक्की समजायचे काय हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. 30 जून पर्यंत चा डेड वॉटर स्टॉक सोडून वरील पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे सम नियोजन झाले पाहिजे हे सुद्धा गरजेचे आहे. अन्यथा धरण उशाला.... कोरड घशाला... अशी परिस्थिती इंदापूर तालुक्यासह वरील तालुक्यातील शेतकऱ्यांची होईल.