सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे परिसराला वरदान ठरलेल्या शासनाच्या जनाई - शिरसाई उपसा जलसिंचन योजनेंतर्गत टेल ला असणाऱ्या वंचित गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यसरकारच्या मंत्रिमंडळात आज ( मंगळवारी ) झालेल्या बैठकित जलसंपदा विभागाने जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी बंद पाईपलाईनला सुमारे ४३८.४८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या योजनेंतर्गत दौंड, बारामती आणि पुरंदर येथील कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आल्याने पाण्यापासुन वर्षोनोवर्षे वंचित असणाऱ्या गावांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
या योजनेतंर्गत जानाईचा कालवा बंद करून ७५ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहेत. तर शिरसाई योजनेचे कालवा बंद करून ५६ किलोमीटर लांबीची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेची कार्यक्षमता ५० टक्क्यांवरून ७७ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
या जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात ८ हजार ३५० हेक्टर भाग सिंचनाखाली येणार आहे. तर शिरसाईतून बारामतीचा अवर्षण भागातील सुमारे ५ हजार ७३० हेक्टरला सिंचनाखाली येणार आहे. पुणे जिह्यातील बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतजमिनीला पाणी पुरविण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना राबविण्यात आली आहे. यासाठी खडकवासला प्रकल्पामधून ३.६ टिएमसी पाणी मंजुर करण्यात आलेले आहे. या प्रकल्पांतर्गत कालव्यांच्या माध्यमातून पाण्याचे वितरण करण्याऐवजी बंदनलिका वितरण प्रणाली (पाईपलाईन) राबविल्यास पाण्याचा अपव्यय कमी होणार आहे. तसेच योग्य दाबाने शेतीला पाणी मिळणार आहे. त्यामुळे ही योजना कार्यान्वित झाल्यापासुन अनेक गावे पाण्यापासुन वंचित राहिली होती त्यांना पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. या योजनेमुळे जानाई-शिरसाई कालव्यावरील २८ गावांना फायदा होणार आहे. तसेच सुमारे १४ हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी मंत्रिमंडळात जनाई शिरसाई योजनेच्या बंदिस्त पाईप लाईनला प्रशासकिय मान्यता दिली. त्यामुळे या निणयाचे आम्ही स्वात करीत आहोत. तसेच गेली अनेक वर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या गावांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती भाजपाचे जेष्ठ नेते दिलीप खैरे, कालवा सल्लागार पोपट खैरे यांनी दिली. --------------------------------------