सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव
आपत्कालीन सेवेसाठी असणाऱ्या पोलिसांच्या ११२ क्रमांकावर वारंवार खोटे फोन करुन सरकारी यंत्रनेचा गैरवापर केल्याप्रकरणी कारखेल ( ता. बारामती ) येथे एकावर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
भीमा दशरथ भापकर ( रा. कारखेल, ता. बारामती ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, भापकर याने पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर जाणीवपुर्वक फोन करुन पत्नीला जिवे मारणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी पोलिस शिपाई सागर वाघमोडे, कारखेल गावचे पोलीस पाटील सचिन जगताप व होमगार्ड सुरज चांदगुडे आदींनी भेट दिली. यावेळी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता जो फोन केला होता तो खोटा असल्याचे दिसून आले.
यावेळी त्याच्या पत्नीस विचारले असता सांगितले की माझा नवरा भीमा भापकर हा विनाकारण ११२ आणि १०८ या क्रमांकावर वारंवार फोन करीत असतात. मला त्याच्यापासून कोणतेही मारहाण झालेली नाही. व जिवे मारण्याचा प्रयत्नही झालेला नाही. हा नेहमी वारंवार खोटे नाटे फोन करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे वारंवार जाणीवपूर्वक खोटी माहिती देवुन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी भीमा भापकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अडचणीच्या काळात ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ पोलिसानांची मदत मिळावी यासाठी ही सेवा तत्पर देण्यात येते. त्यामुळे या सेवेचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा. मात्र काही व्यक्ती जाणीवपूर्वक ११२ क्रमांकावर खोटे फोन करतात. त्यांची माहिती संकलित केली जात आहे. खोटे फोन केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते. मात्र हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे ११२ या क्रमांकावर खोटे कॉल करून चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला जात आहे. तसेच पुढील प्रक्रियेत शिक्षा किंवा दंडही त्या व्यक्तीला होवु शकतो अशी माहिती सुप्याचे सपोनी मनोजकुमार नवसारे यांनी दिली.
.................................