Baramati News l सोमेश्वर कारखाना अपहार प्रकरणी कारखाना प्रशासनाने दिली मोठी माहिती

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वरनगर : महेश जगताप

सोमेश्वर कारखन्यातील झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण संस्थेला १५ मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांना अवगत करून जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 

        सोमेश्वर कारखान्यात टाईम ऑफीसव्दारे झालेल्या लाखो रूपयाच्या अपहारप्रकरणी साखरआयुक्तालयाच्या पॅनेलवरील लेखापरीक्षण संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय कामगार व औद्योगिक न्यायालयाची चौकशी समितीही कायदेशीर चौकशी करणार आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफीस विभागामध्ये लाखो रूपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. गैरहजर कर्मचाऱ्यांची हजेरी मांडून परस्पर त्यांचा पगार लाटण्याचा प्रकार काही वर्ष सुरू होता. त्याची कुणकुण लागल्यानंतर कारखान्याच्या एक्झ्युक्युटिव्ह कमीटीपुढे या प्रकरणाची सुरवातीला प्राथमिक चौकशी झाली. टाईम ऑफीसच्या सर्व अधिकारी, कामगारांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर तथ्य आढळल्याने कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांच्यासह सहा जणांना तत्काळ निलंबित करण्यात आले. यानंतर कारखाना कार्यक्षेत्रात अपहारामुळे संतापाची लाट उसळली होती. सर्वांवरच थेट गुन्हे दाखल करावेत किंवा चौकशी करून दोषी शोधून गुन्हे दाखल करावेत असे दोन मतप्रवाह होते. याबाबत कामगार व औद्योगिक न्यायालयाचे आणि फौजदारी न्यायालयाच्या वकीलांशी चर्चा संचालक मंडळाने चर्चेअंती आधी कायदेशीर आणि मग फौजदारी मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्याने साखर संकुलातील प्रादेशिक सहसंचालक यांना अपहाराबाबत पत्रव्यवहार केला. यानंतर तीन लेखापरीक्षक एजन्सींना बोलवून मेहता-शहा अँड कंपनी या साखरआयुक्तांच्या पॅनेलवरील एनज्सीला लेखापरीक्षण करण्यासाठी नियुक्ती केली आहे. ज्या ठेकेदारामार्फत हा अपहार झाला आहे त्याची नियुक्ती डिसेंबर २०१७ मध्ये केली होती. त्यानुषंगाने २०१७-१८ ते २०२४-२५ या आठ वर्षांतील कामकाजाची तपासणी केली जाणार आहे. त्यात नेमका किती अपहार झाला आहे हे निश्चित होणार आहे. तसेच कामगार व औद्योगिक न्यायालयाचा अनुभव असलेली अॅड. पवार-चव्हाण एजन्सीला कायदेशीर चौकशीची नियुक्ती करण्यात आली. यातून नेमके जबाबदार कोण, अफऱातफर कशी झाली अशा बाबी समोर येणार आहेत. दोन्ही समित्यांचा एकत्रित अहवाल प्रादेशिक सहसंचालक यांना सादर करणार आहोत. अशी माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 

To Top