सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रणाली देशमुख
इंदापूर तालुक्यातील रेडा येथे कामाच्या ठिकाणी बंधक करुन ठेवण्यात आलेल्या 22 मजुर आणि 19 बालकांसह 41 जणांची सुटका करण्यात यश आले असून याप्रकरणी मुकादामासह ट्रॅक्टर मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की संदीप ताराचंद ठाकरे व इतर (रा. कन्नड, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे 25 मार्च रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानुरूप त्यांच्या परिवारातील व्यक्ती हे ऊसतोडीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर, 2024 पासून मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व इंदापूर तालुक्यातील ट्रॅक्टर मालक यांच्या सोबत इंदापूर तालुक्यात गेले होते. मुकादम रघुनाथ धनाजी सोनवणे व ट्रॅक्टर मालक यांनी कामावर जाण्या अगोदर सर्व मजुरांना एकत्रित 11 कोयते मिळून 12 लाख रुपये उचल दिलेली होती.आजपर्यत कामावर 6 महिने होत आले आहेत.
परंतु त्यांना आता पर्यंत केलेल्या कामाचा हिशोब करुन कोणत्याही प्रकारचा मोबदला ट्रॅक्टर मालकाकडून देण्यात आलेला नाही. तसेच सर्व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करीत नाही व जनावरांना सुध्दा चाऱ्याची सोय करुन देत नसल्याने, एका गायीचा मृत्यू झालेला आहे. ट्रॅक्टर मालक मजुरांकडून 8 लाख रुपयाची मागणी करत असून, पैसे न दिल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकी देत आहे.यामध्ये 11 कायते (22 मजुर) व 19 लहान मुले अशी एकूण 41 लोक यामध्ये फसलेली आहेत. सदर लोकांना ट्रॅक्टर मालक यांच्याकडून सोडवून देण्यात यावे, तसेच मुकादम रघुनाथ धनाजी सोनोणे व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती केली होती.
त्यानुरूप जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी व कामगार उपायुक्त यांना पत्र लिहीत कार्यवाहीची विनंती केली. त्यानुरुप बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी रेडा येथील संबंधित ठिकाणी भेट देत सर्व मजुरांची पोलीस बंदोबस्तात सुटका केली व त्यांना इंदापूर पोलीस स्टेशन येथे आणले.
त्यानंतर विष्णु नारायण गायकवाड (वय 31 वर्षे व्यवसाय मजुरी रा.नेवपुर ता. कन्नड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 फेब्रुवारी 25 ते 26 मार्च 2025 या काळात नजर कैदेत ठेवले,कोठेही जायचे झाले तर आमचेवर नजर ठेवत, आम्हाला काठीने पायावर, नितंबावर मारायचे म्हणून झालेल्या त्रासाबद्दल व मारहाणीबाबत रघुनाथ धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर , विकास संजय देवकर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-