Indapur News l कुठलेही नाही ट्रस्ट...सर्व गावकऱ्यांनी मिळून बनवलेल्या कमिटीतून यात्रा होणार मस्त...!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील भादलवाडी येथील यात्रेला गेल्या दोन वर्षापासून गालबोट लागले होते. यात्रेसाठी ट्रस्टची निर्मिती झाल्याने वाद वाढला होता. 
        संबंधित ट्रस्ट रद्द करून नवीन समिती निवडावी , यातून यात्रेचा कार्यक्रम पार पाडावा असा मतप्रवाह ग्रामस्थांमधून व्यक्त होत होता. गेल्यावर्षी यात्रेच्या पूर्वी भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी बैठक घेऊन तोडगा करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही बाजूंकडून वाद होत असल्याने फक्त धार्मिक कार्यक्रम वगळता इतर करमणुकीचे किंवा कुस्तीचे मैदान पार पडले नाही. तदनंतर यावर्षी 27 एप्रिल व 28 एप्रिल या दिवशी भैरवनाथाची यात्रा उत्सव सोहळा पार पडत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी सायंकाळी समस्त ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक घेऊन यात्रे संदर्भात चर्चा केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बैठकीमध्ये अनेक ग्रामस्थांनी वादी व प्रतिवादी यांनी बाजूला व्हावे , नवीन यात्रा कमिटीची निवड करावी, असा मतप्रवाह अनेकांनी व्यक्त केला. त्याच अनुषंगाने नवीन यात्रा कमिटीची निवड करण्यात आली आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांचा या कमिटीमध्ये समावेश आहे. भादलवाडी येथील भैरवनाथ हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. रविवारी सायंकाळी पार पडलेल्या बैठकीमध्ये किरकोळ गदारोळ वगळता ही बैठक शांततेत पार पडली. नवीन यात्रा कमिटीची निवड झाली आहे. त्यामुळे येणारा यात्रा उत्सव सोहळा अत्यंत आनंदित व भक्तीमय वातावरणात पार पडेल असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या यात्रेच्या दरम्यानचा विचार केला तर गाव तसं चांगलं.... पण.... असेच म्हणावे लागेल.
To Top