महाबळेश्वर l रविकांत बेलोशे l घरी अठरा विश्व दारिद्र्य....एकीकडे पोटातील आग.. आणि दुसरीकडे मुलाला दगडाला बांधून आईची जगण्यासाठी धडपड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : रविकांत बेलोशे
घरी अठरा विश्व दारिद्र्य...पोट भरण्यासाठी सारा संसार पाठीवर बांधून रानोमाळ भटकत..मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या माय माऊलीने चक्क आपल्या तीन वर्ष वयाच्या गोळ्याला पायाला दोरी बांधुन दगडाला बांधल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ महाबळेश्वर तालुक्यातील दानवली गावच्या शीतल दानवले यांनी यु ट्यूब वर प्रसारित करताच या घटनेची दखल समाजाने घ्यायला सुरुवात केली आहे. 
          याबाबत अधिक माहिती अशी की पोटाची भूक भागवण्यासाठी जन्मदात्या आईला आपल्या पोटाच्या मुलाचे पाय दगडाला बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. दानवली (ता. महाबळेश्वर ) गावात मोल मजुरी करणाऱ्या महिलेनं आपल्या सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळल्या आहेत. आपल्या मुलाला बोलता येत नसल्याने त्याच्या पायाला दगड बांधून एक आई आपल्या मुलासाठी कोणत्या प्रकारचं जीवन जगते हे जाणून प्रत्येकजण तिला सलाम करतोय. 
पाचवीला पुजलेल अठरा विश्व् दारिद्र,पोटाची भूक शमविण्यासाठी जिवापाड मेहनत. वीतभर पोटासाठी गांव गाव फिरून बिगारी काम करून दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी आई राब राब राबते आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी एका आईने आपल्या पोटाच्या पोरांना काळजीपोटी, तो कुठेही जाऊ नये म्हणून दगडाला बांधून ठेऊन ती मजुरी करीत आहे. 
        दानवली गावच्या शीतल दानवले यांनी यु ट्यूब च्या माध्यमातून या आईची धडपड समाजापुढे आणली आणि तिला मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.  सर्व स्तरातून त्या मातेच्या मेहनतीला सलाम केला जात आहे. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजुबाजूला काही लोक असे असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. त्यामुळे या आईची धडपड नक्कीच जगण्याची उमेद देणारी ठरणार आहे.
---------------------
 शीतल दानवले ,  यू ट्यूब प्रसारक
अशा प्रकारचे वास्तव मला पहायला मिळाले आणि लगेच आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ते चित्रीत केले. आणि समाजमाध्यमांसमोर मांडले. समाजाची कणव कुठेतरी मनाला भिडते. आणि त्यातूनच मला जाणीव होते. त्यामुळे सहज म्हणून काढलेला हा व्हिडिओ सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या माध्यमातून या आई आणि बाळाच्या उपचारासाठी लोकांनी पुढे यावे ही माझी याध्यमातून नम्र विनंती आहे. 

To Top