सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
नीरा (ता. पुरंदर) येथील एका विवाहितेने सासूने शारीरिक व मानसिक छळ केल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. नीता सचिन निगडे (वय 33 रा. प्रभाग क्रमांक सहा निरा. ता. पुरंदर ) असे विवाहितेने नाव आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान लकडे हिला अटक केली असून सासवड न्यायालयात तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने (रा. श्रीगोंदा ता. आहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
विजया निगडे ही नीता यांना वेळोवेळी लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणी करणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देत होती. आणि या त्रासाला कंटाळून नीता यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पुजारी अधिक तपास करत आहेत. सदर घटना 22 मार्च रोजी घडली होती. काल 25 मार्च रोजी विजया निगडे हिला पोलिसांनी अटक करून सासवड न्यायालयात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन मुलांना आई सोडून गेल्याने नीरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पुजारी करत आहेत।