सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
जनाई शिरसाई योजनेला उन्हाळी आवर्तनात ८०० एमसीएफटी ऐवजी १२०० एमसीएफटी पाणी देण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी घेतला.
पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला १२०० एमसीएफटी (उन्हाळी आवर्तन ) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनाई योजनेसाठी वरवंड ( ता. दौंड ) येथील तलावात ६० टक्के तर शिरसाई योजनेसाठी शिर्सुफळ ( ता. बारामती ) येथील तलावात ४० टक्के पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार जनाई योजनेला ३६० एमसीएफटी तर शिरसाई योजनेसाठी २४० एमसीएफटी पाणी मिळणार होते. मात्र या बैठकीत कालवा सल्लागार समितीचे सदस्य पोपट खैरे व विजय मोरे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे उन्हाळी आवर्तन अपुरे असल्यामुळे वाढीव पाण्याची मागणी केली होती. त्यानुसार पवार यांनी ८०० ऐवजी १२०० एमसीएफटी पाणी देण्याचे जाहीर केले.
त्यामुळे जनाई शिरसाई योजनेच्या लाभार्थी भागात उन्हाळी आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती खडकवासला कालवा सल्लागार समितीचे सदस्य पोपट खैरे व विजय मोरे यांनी दिली.
...................................