हितगुजाची भेट ! एस.एस. गायकवाड l पूर्वी नात्यागोत्याची माणसं मजल दरमजल करीत हितगुजासाठी धोतर खांद्यावर टाकून वसतीलाच येत असत....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पूर्वी नात्यागोत्याची माणसं मजलदरमजल करीत हितगुजासाठी धोतर खांद्यावर टाकून वसतीलाच येत असत. रात्रभर गणगोत्रात सुखदुःखाच्या, खुशालीच्या गप्पा रंगत. तांबडं फुटायच्या वेळेला घराच्या ओढीने पुन्हा रस्ता धरला जाई. उनं वाढायच्या आत घर जवळ केलं जाई. त्यात देणंघेणं नसे. हा सांस्कृतिक परंपरेचा वसा. नाती टिकवणं आणि माणूसकी जपणं हा एकच उद्देश..
        हा गुण आपल्याही रक्तात भिनलेला आहे पण विज्ञानवादी जगात नवेलेपणात दाखवायचा कसा ? कोणी नावं तर ठेवणार नाही ना ? म्हणून एकलकोंड वागायच ही आजची रीत.. पण पाण्यानं काठोकाठ हांडा भरावा आणि ओसांडून वाहावा तस मन आज ही सगळी दिखाऊ बंधन झुगारुन देऊन पूर्वीच्या संस्कारात रमून जातं कोणी काही का म्हणेना ? करायचय काय आपल्याला कोणाचं ? म्हणून सेवानिवृत्तीच्या दशकानंतर ही समकालीनाबरोबर अंगणातील झाडाखाली वर्तमान व भूतकाळातील मोकळ्या गप्पांचा फड वेळी अवेळी रंगून जातो. कमी साखरेच्या चहाचा आस्वाद घेत देण्याघेण्या शिवाय मन तृप्त होतं...

असंच एक दिवस.श्री. बबनराव मासाळ, श्री. भिमराव बनसोडे यांच्या कल्पनेतून नोकरीतील जेष्ठ सहकाऱ्यांच्या भेटी हा उपक्रम ठरला... घरबसल्या माणूस जवळ करायचं साधन म्हणजे मोबाईल.. लगेच समविचारी सहकाऱ्यांशी संपर्क झाला. उपक्रमाला सहकाऱ्यांची गैरहजेरीत हजेरी लागली. होकारार्थी प्रतिसाद. लगेच नियोजन. प्राधान्य क्रमानुसार जेष्ठ सहकारी श्री. रामचंद्र सिताराम हिंगणे कला शिक्षक. ऐंशीच्या घरातले. पुण्यात सिंहगड रस्त्यावर वास्तव्यास असणारे. त्यांची भेट घ्यायची. दिवस ठरला. रविवार सोळा मार्च २०२५ pune विद्यार्थी आप्पा मासाळ सारथी आणि रथ (वाहन) हे त्याचचं. आदरार्थी आणि प्रेमळपणाने घरच्यासारखं. अलिकडे आजारपणानं गांगारलेलं कमी बोलणारे श्री.एस. के. सोरटे, दोन्ही कानांनी कमी ऐकू येणारे पण बोलण्यात चलाख श्री ए.जी. केंजळे, सदैव गोड बोलत हसणारे श्री. भिमराव बनसोडे, विस्मरणात जात पुन्हा भानावर येणारे श्री. बबनराव मासाळ, वयाने सर्वात लहान पण विनोदी, पाण्यासारखे सहज एकरुप होणारे, जेष्ठत्वाची बूज राखणारे श्री. दिलीप वाडकर आणि थोडं ऐकायला कमी पडलेला अनामिक ओढीचा मी.

आमचा सकाळच्या प्रहरीच प्रवास सुरु झाला. मंद गार वाऱ्याची झुळूक. नवीन झालेला ज्ञानेश्वरांचा ऐसपैस पालखी मार्ग. लहान मुलांसारखं खिडकीतून कुतुहलाने डोकावत प्रवासाचा आनंद काय औरच..! पुण्यात वसतीला असणाऱ्या समकालीन जेष्ठ शिक्षिका श्रीमती मावळणकर यांना ही भेटीची कल्पना दिली.. जेजुरीच्या खंडेरायाचे दूरुन दर्शन आणि पुरंदरच्या आंजीराची मधुर चव चाखत अवघड अरुंद बाबदेव घाटातून पुणे दर्शन झालं.

अस्ताव्यस्त पसरलेलं, आकाशचा वेध घेणाऱ्या गगनचुंबी इमारती. शुभ्र बगळे ओळीने भक्ष्याची वाट पाहात बसल्यासारखे नयन मनोहरी दृश्य, त्यात थोडा वातावरणाचा धूसरपणा. पुण्याच्या गर्दीत विरघळून गेलो. सर्वत्र माणसंच माणसं पण अनोळखी चेहरे. गर्दीतून मोटार सरकत होती. होई होई तो नवले पूलाखालून सिंहगड रस्त्याला लागलो... आणि श्री. हिंगणेसरांच्या भव्य ओनरशिप इमारती समोर पोहोचलो. पाळण्यात बसल्यासारखे लिफ्टमधून दारा समोर पाच सहाजण घरात पोहोचलो तेव्हा वयवृद्ध झालेल्या हिंगणेसरांचा आनंद ओसंडून वाहत होता. भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा आनंदाचा हिंदोळा होता... तसे आम्ही पाहुणे नव्हतो तर जीवनातील चढ उताराचे साक्षीदार, सखेसोबती होतो. सुखदुखांच्या प्रसंगाचे भागीदार.. पण आता नियतीने केलेले दूरस्त मैत्र होतो.

भूतकाळातील हितगुज रंगत राहिलं. जुन्या प्रसंगांनी सर्वाची मनं भरुन गेली होती. प्रत्येकजण आपल्या आपल्या शाळेतील प्रसंगांनी न्हाऊन निघत होता. किती सांगावं आणि काय सांगाव असं प्रत्येकालाच वाटत होतं. सोमेश्वर विद्यालयातील तात्कालीन उपक्रम, कधी न येणाऱ्या प्रवासाला निघून गेलेले सोबती कै. आर. के. पवार, कै. पी. के. मांढरे, कै. के. एन. येवले, कै. व्हि. डी. सकुंडे, कै. हनुमंत सावंत... यांच्या रुसव्या फुगव्याच्या पण हृद्यस्पर्शी आठवणी जाणतेपणाची बूज राखून गेल्या... परिसरात मिळालेली तात्कालीन क्रिडा, नाट्य चॅम्पियनशिप.. त्यासाठी केलेले सातत्यपूर्ण परिश्रम.. त्यातील रुसवे फुगवे प्रसंग.. मिळालेली मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे. त्यातील आठवणीतील म्हणजे तात्कालीन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुख, मराठीतील सिनेअभिनेते वसंत शिंदे यांच्या हस्ते पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरातील बक्षिस वितरण... मुख्याध्यापक श्री. एस्. डी. जगताप आणि श्री. एस. के. वाबळेसर यांची प्रेरणा.. शाळेतील नोंदणी केलेली स्टाफ सोसायटी, शिक्षकांच्या सामुहिक कौटुंबिक योजना त्यातील क्राऊन टीव्ही, गोदरेज कपाटे असं बरचं कांही...

या गप्पांच्या मैफलीत आगमन झालेल्या मायलेकी श्रीमती मावळणकर बाई, आणि त्यांची पन्नाशीतील मुलगी सौ. आर्चना या ही प्रेमळ आणि स्नेहमय मैफीलीत कधी एकरुप झाल्या ते कळलेच नाही... मी या ठिकाणी नोकरीत कसा आलो. माजी संचालक कै. आप्पासाहेब जगताप, कै. केरबा धर्माजी बनसोडे, प्राचार्या सौ. सुशिलाताई आठवले या देवमाणसांच्या आठवणी आणि हे सर्व होण्यासाठी कारणीभूत असलेले हिंगणेसर आणि त्यांचे साडू भाव आणि माझे शिक्षक कै. शिवाजी राऊत सर यांच्या अनमोल जीवनाचं सोनं करणाऱ्या आठवणी मी सांगता सांगता तन्मय होऊन गेलो होतो जीवनातील अडचणीच्या प्रसंगात दिलेली एकमेकांची साथसंगत त्यामुळे निभाऊन निघालेल्या प्रसंगांची पेरणी होत असतानाच अनामिक ओढीने तेथे दाखल झालेले सोबती श्री. एम. जी. वाबळे आणि त्यांचे आयटी क्षेत्रात कार्यरत असलेला चिरंजीव बारका हर्षद (पण आता इंजिनिअर असलेला) ते ही या गप्पांच्या मैफलीत कधी एकरुप झाले ते त्यांनाही कळले नाही. का कुणास ठाऊक ती एक जीवाभावाच्या ओढीने झालेली भेट होती... या भेटीत अनुपस्थित असलेल्या सोबत्यांची ही हजेरी लागल्या सारखी वाटत होती. आठवणींनी सर्वजण चिंब भिजून गेल्यासारखे वाटत होते... मधूनच श्री. दिलीप वाडकर सर सहजतेने न कळत फिरकी घेऊन विनोदाने हास्य फुलवत होते. तिथं गांभीर्याला विनोदाची किनार आपोआप येत होती.. तर हिंगणेसरांचा मुलगा सचिन, मुरुमची माहेरवाशीण असलेली सूनबाई नातवंडे, सौ. अर्चना, श्री. हर्षद हे नम्रता पूर्वक आमच्या पायांना स्पर्श करुन आमच्या जेष्ठत्वाची आम्हाला जाणीव करुन देत होते. हे सगळं संस्कार आणि संस्कृतीचं देणं. विविध विषयावर गप्पा रंगत होत्या त्याच भान कोणालाच नव्हतं. अलिकडे ए. बी. चव्हाण सरांची तब्बेत ठिक नसते त्यांना केंजळेसरांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांनाही या मैफलीत सहभागी करुन घेतले. विज्ञानाच्या किमयेने प्रत्यक्ष दृष्टभेट. त्यांना ही जुने सोबती एकत्र दिसल्याने त्यांचे मन भरुन आले.. गप्पांची मैफिल संपूच नये असे सर्वांना वाटे पण घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत होते... न कळत क्षणचित्रे टिपण्यास आमचा विद्यार्थी पण आजचा सारथी आप्पा मासाळ कमी पडला नाही.. ती एक भविष्याची साठवणूक आणि शिदोरी असते... भूतकाळात रमण्यासाठी. आता आम्ही श्री. हिंगणे सरांच्या कुटुंबियांचा निरोप घेत जड अंतःकरणाने निघालो होतो. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आमचा पाहुणचार व्हावा यासाठी श्री. हिंगणेसरांचे मन अधिर झाले होते. गावाकडची अस्सल चव आशा गावरान हॉटेल तडकाकडे आमची पावलं वळाली. तिथं बसल्यावर माणूसकी जपणारं व्यक्तिमत्व प्रेमळ म्हणजे एस. पी. जगतापांची आठवण आली अन् त्यांना या ठिकाणी बसल्याचा मॅसेज केला. त्यांनीही प्रतिसाद दिला पण या भेटीत सहभागी होता न आल्याबद्दल हळहळ व्यक्त करीत. मनापासून गप्पा आणि यथेच्छ जेवण सगळं कसं तृप्ततामय... जेवणाचाही ढेकर आणि मनमुराद गप्पांचाही..
दुपारचे कदाचित तीन वाजून गेले असावेत. सर्वजण बाहेर रस्त्यावर आलो. परतीच्या प्रवासाच्या विचाराने. एकमेकांकडे ओशाळलेल्या नजरेने पहात होतो. माहेरकडच्या माणसांचा निरोप घ्यावा तशा माहेरवाशिणी सारखी आप्पांची आवस्था झाली होती. त्यांचा चिरंजीव सचिन ही आमच्याभोवती घुटमळत होता.. होता होता दृष्टभेट झाली. हस्तांदोलन ही झाले. आता निघायच होतं. बबनराव मासाळ यांचा चेहरा आणि आप्पांचा अतिशय उद्विग्न झाला होता. हस्तांदोलनाचे रुपांतर एकमेकांना मिठी मारुन अलिंगन देण्यात झालं. हा भावुक आणि स्नेहमय प्रसंग दिलीप वाडकरांनी टिपला..

आणि आम्ही पुण्याच्या गर्दीतून सोमेश्वर नगरकडे मार्गस्थ झालो... ऋणानुबंधाच्या आठवणींची शिदोरी घेऊन आप आपल्या जीवन प्रवासाच्या वाटेने.. असंच पुन्हा कधीतरी भेटण्याच्या आश्वासक विचारानं..

श्री. एस. एस. गायकवाड सर 
७७६८०९८२९६
To Top