सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना उद्या शुक्रवार (दि. २८) रोजी एफआरपीची उर्वरित रक्कम ३७३ रुपये प्रति टनाप्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वरची एकूण एफआरपी ३१७३ रुपये प्रतिटन असून ती जिल्ह्यात उच्चांकी आहे. कारखान्याने या अगोदर २८०० रुपये प्रतिटन इतकी पहिली उचल सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. शुक्रवारी सभासदांच्या खात्यावर ३७ कोटी १७ लाख रुपये वर्ग करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच १६ ते २५ मार्च दरम्यान गाळप झालेल्या ऊसापोटी सोसायट्यांना साडेसहा कोटी रक्कम वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सहकारी सोसायट्यांनी सोमेश्वर कारखान्याकडे आवश्यक असलेल्या रकमांची यादी पाठवली आहे.
शुक्रवारी पैसे जमा होणार असल्याने अनेकांना पुढील दोन दिवसात सोसायटी आणि बँकांचे कर्ज भरता येणार आहे. यामुळे सभासदांना दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने केंद्र सरकारच्या सूत्रानुसार एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिना संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सोमेश्वर कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी सभासदांना कर्जफेड, शेतीभांडवल, शिक्षण यासाठी मदत मिळणार आहे. तसेच ३० मार्च रोजी सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम संपणार असून आतापर्यंत कारखान्याने १२ लाख टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. सव्वा बारा लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे.