सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता. बारामती येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून दोन गटात मारामारी झाली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमीर नजीर सय्यद यांनी फिर्याद दिल्यानुसार लाला चांद सय्यद, अजित चांद सय्यद, यासीन चांद सय्यद (तिघे रा. भेकराईनगर, पुणे), राजू सय्यद, अमीर राजू सय्यद, मन्सूर राजू सय्यद, अफसाना राजू सय्यद, इकबाल मेहबुब सय्यद (रा. निंबुत, ता. बारामती) या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी (दि. 2) दुपारी ही घटना घडली. शेतजमिनीच्या कारणावरून फिर्यादीचा तसेच लाला सय्यद, राजू सय्यद यांच्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून वाद आहेत. ते मिटविण्यासाठी लाला सय्यद यांनी फिर्यादीच्या वडिलांना फोन करून थांबण्यास सांगितले होते. लाला सय्यद, अजित, यासीन हे सर्व भेकराईनगर येथून त्यांच्या मोटारीतून निंबुत येथे आले. त्यावेळी शेतीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच अंतर्गत रस्त्याच्या ये-जा करण्याच्या कारणावरून लाला यांनी फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ करत आईला चापट मारली.
घरातील सर्व जण भांडणे सोडविण्यासाठी गेले असताना अजित सय्यद, यासीन सय्यद यांनी गाडीतून लाकडी दांडकी काढून या दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात, हातावर मारहाण केली. राजू, अमीन, मन्सूर यांनी दगड व विटांनी मारहाण केली. इकबाल व जफर यांनी लाकडी दांडके व हाताने मारहाण केली. फिर्यादीला सोडविण्यासाठी त्यांचा भाऊ समीर, चुलतभाऊ इरफान हे आले असताना त्यांना लाकडी दांडके, विटांनी मारहाण करण्यात आली. अफसाना यांनी फिर्यादीच्या आईला मारहाण केली. फिर्यादीवर वाघळवाडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
दुसऱ्या बाजूने इकबाल महिबुब सय्यद यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गुलशन नजीर सय्यद, अमीर नजीर सय्यद व इरफान नजीर सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल केला. फिर्यादीची निंबुत गावच्या हद्दीत गट क्रमांक 693 मध्ये शेतजमीन आहे. बुधवारी ते भाऊ राजू महिबुब सय्यद, यासिन चांद सय्यद, अजित चांद सय्यद, लालमहंमद चांद सय्यद व नजीर बशीरभाई सय्यद असे राजू सय्यद यांच्या घरासमोर गट क्रमांक ६९३ या शेतजमिनीतील बांध पोखरल्याच्या कारणावरून चर्चा करत होते. या वेळी गुलशन व अमीर सय्यद यांनी शेतातील रस्त्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. लालमहंमद सय्यद यांनी त्यांना शिवीगाळ करू नका, इथे चर्चा सुरू आहे, तुम्ही त्यात पडू नका असे म्हणाल्याच्या कारणावरून अमीर याने त्यांच्या अंगावर उडी घेत त्यांना खाली पाडून तोंडावर काठीने मारहाण केली. फिर्यादी व अजिज हे भांडणे सोडवत असताना अमीर याने त्यांना काठीने डोक्यात व डाव्या पायाच्या नडगीवर मारहाण केली. या तिघा आरोपींनी, तुम्ही शेतातील रस्ता मोठा करा, नाही तर तुमच्याकडे बघतोच असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.