सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कराड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनेलनं भाजपच्या दोन प्रमुख नेत्यांच्या पॅनलचा पराभव केला आहे.
भाजपच्या आमदारांसह भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या पॅनलचा सुपडा साफ झाला आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्यानं विजयी झाले आहेत. त्यामुळं कराडात मोठ्या प्रमाणावर जल्लोष सुरू आहे. सह्याद्री साखर कारखान्याची ऐतिहासिक निवडणूक म्हणून पाहिली जात होती त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलनं एकतर्फी विजयी मिळवला. भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या पॅनलचा धुवा उडवत 21 जागांवर बाळासाहेब पाटील यांचे पॅनल विजयी झाले. बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनलनं मोठा विजय मिळवल्यानंतर कराड शहरात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आली.
सह्यादी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गेल्या दीड महिन्यात सातत्यानं पाचही तालुक्यातील सभासद, ज्यांनी परिश्रम घेतले ते सर्व नेत्यांचे आभार मानले. कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाणांच्या विचारासोबत राहणाऱ्या मतदारानं पी.डी. पॅनेलवर विश्वास टाकला. 1999 पासून दोन टर्म आणि त्यानंतर मतदार फेररचना झाल्यानंतर तीन टर्म मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार साहेबांनी मला सहकार खात्याची जबाबदारी दिली. विधानसभा निवडणुकीत मविआचा पराभव झाला, माझाही झाला. मात्र, पराभवानं खचून जायचं नसतं. विजय झाला तर विजय पचवता आला पाहिजे, असं बाळासाहेब पाटील म्हणाले.