सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव खुर्द अल्पवयीन असलेल्या मुलीचा परस्पर चालू असलेला बालविवाह माळेगाव पोलिसांनी रोखला. नवरदेव, आई-वडील तसेच नवरीच्या आई वाडीलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवरी मुलीचे आई- वडील
राजेश अजगर भोसले, वारणा राजेश भोसले दोघेही रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे नवरदेव राहुल भानुदास शिंदे, नवरदेवाचे आई-वडील भानुदास मायाजी शिंदे व नवरदेवाची रुपाली भानुदास सर्व रा. पिपरी ता खंडाळा जि सातारा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील माळेगांव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंतर्गत येणारे मौजे माळेगांव खुर्द या गावात दिनांक 20 रोजी सायं ४ वा.चे सुमारास एका विशिष्ट समाजातील नातेवाईकांनी एकत्र येऊन नवरी मुलीचे वय 13 वर्ष 8 महिने असलेबाबत नवरी मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील माळेगांव खुर्द गावचे ग्रामपंचायत मालकीचे यशवंत सभागृह येथे ग्रामपंचायत कार्यालयास कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर लग्न लावून दिलेबाबतची माहिती गुप्त बातमीदार यांचे कडून माळेगांव पोलीस ठाणे चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे यांना मिळाली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक सदर घटनास्थळी रवाना करून त्यांना मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेमुळे पोलीस पथकाने मिळाले बातमीचे अनुषंगाने सत्यता पडताळून नवरी मुलगी अल्पवयीन असल्याची खात्री केले नंतर एकंदरीत सदर घडलेली घटना ही बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असलेने संबंधित आरोपींना माळेगांव पोलीस ठाणे येथे चौकशी कामी आणण्यात आलेले होते.
सदर घटनेच्या अनुषंगाने माळेगांव खुर्द या गावचे ग्रामपंचायत अधिकारी इम्तियाज राजमहंमद इनामदार यांनी फिर्याद दाखल केली आहे.
--------------------------
कोणताही कायदा मंजूर करण्यापूर्वी ते विधेयक तयार करण्यासाठी शासन त्याचे फायदे आणि तोटे हे खात्री केलेनंतर त्या नियमावली सर्व समाजाच्या दृष्टीने लागू करणे आवश्यक असल्यासच भारतीय संसद कोणताही कायदा मंजूर करून त्या नियमावली प्रमाणे कार्यवाही करण्याचे काम शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडे दिले जाते, त्या मुळे या सर्व बाबींचा विचार करून सर्व नागरिकांनी आपले वर्तन हे सर्व कायदेशीर नियमात राहील यासाठी प्रयत्न करावा, जेणे करून कोणत्याही कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार नाही. तसेच जो कोणीही कायदा मोडेल त्यांचेवर कडक कायदेशीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन माळेगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन लोखंडे यांनी केलेले आहे.