सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : मोहित देवधर
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गवरील खंडाळा-पारगाव येथे टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन टँकरचालक जागीच ठार झाला तर सोबत प्रवास करणारा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. प्रवीण राजाराम शिंगटे (वय-३९ वर्षे, रा.गोटखिंड, ता.वाळवा जि.सांगली) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार दि.९ रोजी एका खाजगी दूध कंपनीचा टँकर (क्र.एम. एच.10 डी.टी.9800) सांगलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान, रात्री सव्वादहाच्या सुमारास पारगाव खंडाळ्यातील काळभैरवनाथ मंदिर परिसरात टँकर अचानक पलटी झाला. यावेळी चालकासह दोन प्रवासी टँकरमध्ये प्रवास करत होते. टँकर पलटी होताच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कठड्यावर जाऊन आदळल्याने कठडा तुटून टँकरच्या केबिनमध्ये शिरला. यामध्ये कठड्यावर डोके आदळल्याने ट्रकचालक प्रवीण राजाराम शिंगटे हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला तर सोबत प्रवास करणारे विकास अशोक फाळके (रा.सातारा) हे गंभीर जखमी व अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला. टँकरमधील दूध मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेले.
अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, शिरवळ रेस्क्यू टीम व ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी जखमीला तात्काळ रुग्णालयात हलवले व टँकरच्या केबिनमध्ये चालकाचा अडकलेला मृतदेह उपस्थिततांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णवाहिकेतून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात आणत शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर जी पवार, पोलीस अंमलदार दत्ता दिघे, प्रकाश फरांदे, सचिन शिंदे उपस्थित होते.
या अपघाताबाबत मनोज यशवंत आरगडे याने दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर जी पवार हे करीत आहेत.