Khandala Breaking l खेळताना तोल जाऊन नीरा नदीच्या पाण्यात पडल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू : शिरवळ येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिरवळ : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील मंडाई माता मंदिर परिसरातील काळा डोह याठिकाणी खेळत असताना तोल जाऊन पाण्यामध्ये पडल्याने 4 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला आहे.यामध्ये कृष्णा उर्फ बाबू आनंदा जाधव(वय 4 वर्षे)असे बुडून मृत्यू झालेल्या लहानग्याचे नाव आहे. 
         याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील मंडाई कॉलनी याठिकाणी जाधव परिवार वास्तव्यास आहे. दरम्यान, गुरुवार दि.10 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान कृष्णा उर्फ बाबू जाधव हा मंडाई माता मंदिर परिसरातील नीरा नदीच्या पात्रातील काळा डोह नामक पात्रालगत टायरने खेळत असताना अचानकपणे तोल जाऊन पाण्यात पडत बुडाला.यावेळी घटनास्थळी कोणीही नसल्याने कृष्णा उर्फ बाबू जाधव हा पाण्यामध्ये बुडल्याचे लक्षात आले नाही मात्र बराच वेळ झाला तरी कृष्णा उर्फ बाबू जाधव हा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी व स्थानिक तरुणांनी परिसरामध्ये शोधाशोध सुरू केली असता मंडाई माता मंदिरालगत असणाऱ्या नीरा नदीच्या पात्रालगत असणाऱ्या काळा डोह नामक पात्रालगत कृष्णा उर्फ बाबू जाधव हा खेळत असलेला टायर आढळून आल्याने तो पाण्यात बुडल्याची भिती व्यक्त करम्यात आली.यावेळी या घटनेची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी तातडीने शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भगत,पोलीस अंमलदार विशाल काटे,प्रशांत धुमाळ,अरविंद बा-हाळे,भाऊसाहेब दिघे व शिरवळ रेस्क्यू टिम तसेच भोर जलआपत्ती समिती यांना व स्थानिक तरुणांना पाचारण केले.यावेळी नीरा नदी परिसरात शोधाशोध केली असता संबंधित लहानग्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तब्बल 9 तासांनी स्थानिक तरुणांना आढळून आला.यावेळी कृष्णा उर्फ बाबू जाधव याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.यावेळी या घटनेची निखिल जाधव यांनी फिर्याद दिली असून पोलीस अंमलदार प्रशांत धुमाळ हे करीत आहे. चौकट- आई-वडिलांचा नातेवाईकांचा आक्रोश शिरवळ येथील नीरा नदी परिसरात लहानगा बुडल्याची माहिती वाऱ्यासारखी शिरवळ परिसरात पसरताच बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी लहानग्याचा मृतदेह मिळून येताच व एकुलता एक मुलगा असलेल्या लहानग्याचा मृतदेह पाहताच आई-वडील,बहीण व नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांची हृदय पिळवटून टाकणारा होता.त्यामुळे शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.
To Top