सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : सतीश गायकवाड
पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथे तीन वर्षापूर्वी एकतर्फी प्रेमातून झालेल्या युवतीच्या खून प्रकरणी संशयित आरोपीस सातारा जिल्हा सञ न्यायालयाने जन्मठेप व पस्तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. निखिल राजेंद्र कुंभार वय २६ रा. पिंपोडे बुद्रुक असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत वाठार स्टेशन पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता माहिती दिली. पिंपोडे बुद्रुक, ता.कोरेगाव येथे दि. ६ मार्च २०२२ रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास पिंपोडे बुद्रुक गावामधील श्रीराम किराणा स्टोअर्स या दुकानाच्या वरच्या माळयावर असलेल्या पंचम क्लासेस येथे आरोपी निखील राजेंद्र कुंभार याने मृत पिडीता ही अभ्यास करत असताना हातातील चाकुने एकतर्फी प्रेमातुन धारदार चाकुने भोसकुन गंभीर जखमी करुन तिचा खुन केला. याबाबतचा फिर्याद गुन्हा वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. बोंबले यांनी गुन्हयाचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस कोसमकर यांच्या समोर सदर खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थिती जन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैदयकीय अधिकाऱ्यांची साक्ष तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून व जिल्हा सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीच्या कृत्याबाबत उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केले. समोर आलेला पुरावा ग्राहय मानुन न्यायाधीश कोसमकर यांनी शुक्रवारी आरोपीस खुनाच्या आरोपात दोषी धरून जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम ४५० अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पिडीतेच्या पालकांना देण्याची सूचना केली आहे.