सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : ॲड.गणेश आळंदीकर
१९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर १९६७ साली "उपकार"सारखा अजरामर चित्रपट मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केला .ज्यामध्ये "जहा डाल डाल पर सोने की चिडीया करती है बसेरा वो भारत देश है मेरा ", मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हमको तेरी कसम....अशा गाण्यातून त्यांनी देशवासीयांची देशभक्ती जागृत केली होती. त्या चित्रपटात सैनिकाचे व सामान्य शेतकरी जीवन,घराघरातील संघर्ष,युद्ध संघर्ष दाखवले . मनोज कुमार यांनी बहुतांश चित्रपटातून भारत हेच स्वतः चे नाव ठेवल्याने भारतकुमार म्हणून ओळख मिळवलेले मनोजकुमार यांचे शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता मुंबई मध्ये निधन झाले आणि बारामतीमध्ये मनोज कुमार यांनी इंदिरा काँग्रेस द्वारे बारामतीत विधानसभेच्या निवडणुकीची प्रचारसभा घेतली त्याच्या आठवणी जाग्या झाल्या.
१९८५ मध्ये निंबूतचे शहाजीराव मुगुटराव काकडे बारामती विधानसभेसाठी पुलोद चे शरदचंद्रजी पवार यांचे विरुद्ध उभे राहीले होते .फेब्रुवारी मधे ट्रक ,गाड्या व कार मोटारसायकली अशी मोठी रॅली निंबूत पासून बारामती पर्यंत काढण्यात आली.त्यानंतर शहाजी काका काकडे यांचे प्रचारासाठी मनोजकुमार यांनी बारामती मध्ये भव्य सभा घेतली होती.
करंजेपुल येथे कै.शिवाजीआण्णा भोसले यांचे यशवंत चित्र मंदीर होते. येथे उपकार, क्रांती असे मनोजकुमार यांचे चित्रपट बरेच दिवस चालले. त्याकाळी मध्यंतर झाला की मेरे देश की धरती, तून तून तारा रारा तून तारा, क्रांती मधले जिंदगी की ना टूटे लडी, प्यार कर ले घडी दो घडी,अशी गाणी कायम वाजायची.
उपकार चित्रपटातील "कसमे वादे प्यार वफा सब, बाते है बातो का क्या, कोई किसी का नही यहा पर नाते हे नातो का क्या.... आज सुद्धा जीवनाचे सार सांगून जाते. मनोजकुमार यांनी त्यांच्या चित्रपटातून भारतीय संस्कृती चे दर्शन दाखवले .तरुणांमध्ये .देशभक्ती जागृत करण्याचे मोठे काम त्यांनी केले.रोटी कपडा और मकान, पूरब और पश्चिम,उपकार, वो कौन थी, शो,गुमराह पत्थर के सनम,सन्यासी, शहीद, दस नंबरी, हिमालय की गोद मे,हरियाली और रास्ता,नील कमल,जयहिंद देशवासी असे अजरामर चित्रपटातून त्यांनी काम केले.अनेक चित्रपटाचे दिग्दर्शन केले, गीते लिहिली.
चित्रपट हा समाजप्रबोधन करणारा असावा. आपल्या संस्कृतीचे दर्शन करवणारा असावा याच उदात्त हेतूने त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले. आजकालच्या चित्रपटामध्ये अपवादात्मक सोडले तर अंगप्रदर्शन किंवा मारामारी शिवाय उत्तम कथानक दुर्मिळ झाली आहेत. त्यामुळेच असे कलाकार असे लेखक असे दिग्दर्शक आता अपवादात्मक आढळतात अर्थात अलीकडच्या काळात बरेचदा युवकांना देखील अशी कथानकामध्ये रस नसल्याचे दिसते त्यामुळे जे विकते ते पिकते म्हणायचे .
आपल्या कारकिर्दीत देशभक्ती पर अजरामर चित्रपट व गीते देणाऱ्या मनोजकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली...