सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
शहरातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ते रत्नदीप कास्टिंगचे संस्थापक म्हणून कार्यरत होते.
तब्बल १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते बिहारला गेल्यापासून ते बेपत्ता झाले होते. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खूनाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी काही दिवसांपुर्वी उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना झारखंडमधील खाण उपकरणांशी संबंधित सुमारे १०० कोटी रुपयांची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यानंतर चर्चेसाठी त्यांना बिहारमधील पटना येथे आमंत्रित केले होते. त्यानुसार ११ मार्चला शिंदे हे विमानाने पटना येथे पोहोचल्यानंतर, त्यांनी संबंधित व्यक्तींसोबत चर्चा केली. आरोपींने त्यांचे अपहरण करुन दूरच्या ठिकाणी नेले. त्यांच्या बँकखात्यातून रक्कम वर्ग करुन घेत त्यांची हत्या केल्याची माहिती पटना पोलिसांनी दिली आहे.