सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
बेकायदा गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी भुईंज (ता. वाई) येथील दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी व पिस्तूल असा सुमारे सव्वालाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
----रवी रवींद्र जाधव (वय २३) व रेवणसिद्ध भीमाअण्णा पुजारी (वय २७, दोघे रा. भुईंज, ता. वाई) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून येणाऱ्या दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना काल मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मोळाचा ओढा ते करंजे नाका या परिसरात सापळा रचला होता. यादरम्यान मोळाचा ओढा येथे पोलिसांना दोघे जण संशयितरीत्या फिरताना दिसले. त्यांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
अंग झडतीमध्ये त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल व ५० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अधिकारी कुमार ढेरे, हवालदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर आदी कारवाईत सहभागी होते.