Sugar factory l उद्या 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब ! कोणाला संधी?...यांची नावे चर्चेत..इच्छुकांची थेट अजितदादांकडे फिल्डिंग !

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान उपाध्यक्षांची मुदत संपल्याने गुरुवार (दि. ३)रोजी निवड प्रक्रिया पार पडणार असून उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. 
            उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. पाच वर्षांत पाच उपाध्यक्ष होणार असल्याने पाच संचालकांना या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असून, ते आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतात, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्याच कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने करणाऱ्या संचालकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे धक्कातंत्र वापरत पुन्हा एकदा पुरंदर की बारामती तालुक्याला संधी देतात का, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी इच्छुक संचालकांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तरुण, अभ्यासू, सहकारातील जाण असलेल्या तरुण संचालकांना संधी मिळते की ज्येष्ठ संचालकांना संधी मिळणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. सुरुवातीला आनंदकुमार होळकर आणि त्यांनंतर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच महिला संचालक प्रणिता खोमणे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. तिसऱ्या वर्षात पुरंदरचे बाळासाहेब कामथे यांना उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम आखण्यात आला आहे. 
              सध्याच्या संचालक मंडळातील उद्योजक  संग्राम सोरटे, किसन तांबे, ऋषिकेश गायकवाड, हरिभाऊ भोंडवे, शांताराम कापरे, शिवाजीराव राजेनिंबाळकर तसेच जितेंद्र निगडे यांची नावे चर्चेत आहेत.जुन्या करंजे गावातील व शेजारील गावामध्ये कारखाना स्थापनेपासून त्या भागातील संचालकांना संधी मिळाली नसल्याची चर्चा सभासदांमध्ये आहे. कारखान्याच्या इतिहासात मागास घटकाला उपाध्यक्षपदी संधी मिळालेली नाही त्यामुळे ऐनवेळी मागास घटकातील संचालकाचा विचार होऊ शकतो. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अजित पवार हे अनपेक्षित धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे
To Top