Baramati News l तीच शाळा...तेच वर्गमित्र...आणि तेच शिक्षक...! एकवीस वर्षानंतर वाणेवाडीच्या न्यु इंग्लिश स्कुलमध्ये भरला पुन्हा दहावीचा वर्ग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या २००३-२००४ मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला.        
यानिमित्ताने आपापल्या आयुष्यात स्थिर झालेले माजी विद्यार्थी एकवीस वर्षांनी एकमेकांस भेटले. तसेच तत्कालीन शिक्षकांचे शाल, श्रीफळ आणि भगवद्गीता देऊन ऋण व्यक्त करण्यात आले. सर्वांना एक छोटंसं पण अत्यंत अर्थपूर्ण स्मरणचिन्ह — वृक्षाचं रोप — देण्यात आले. वृक्षारोपणाचं पवित्र कार्य म्हणजे एक छोटं पाऊल, पण हरित भविष्याकडे मोठी वाटचाल! आठवणीही जपूया, पर्यावरणही वाचवूया! हा संदेश देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेला व्यासपीठ भेट दिले. शाळेचे कार्यरत शिक्षक व प्रतिनिधी म्हणुन श्री अशोक भोसले सर यांनी त्याचा स्विकार केला. 
             १९९८-१९९९ ते २००३ -२००४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूलच्या वाणेवाडी मुख्य शाखेत पाचवी ते दहावी (अ तुकडी) अशी सहा वर्ष सोबत घालविलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्नेहमेळावा घेण्याचा निर्णय घेतला. नीलम भोसले व प्राची भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला. जयदीप जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, वैभव कोरफड, जोशंत जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. स्नेहमेळाव्यात पंचेचाळीस विद्यार्थी आणि वीस शिक्षक यांनी उपस्थिती दर्शविली. सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांचे मार्गदर्शक श्री. काशीनाथ शिंदे सर, शहाबुद्दीन मणेर, दत्तात्रेय माने, आनंदराव माहूरकर, शिवकुमार भोईटे, भाऊसाहेब गुलदगड या शिक्षकांनी चाळीशीत पोचलेल्या माजी विद्यार्थ्यांचा पुन्हा तास घेतला आणि उर्वरित आयुष्यातही शिस्त, चारित्र्य आणि कष्टाला पर्याय नाही असे मार्गदर्शन केले. त्यांच्यासह पांडुरंग कोरफड, अजित भोसले, जाधव सुरेश, जगताप चंद्रकांत , जगताप संभाजी , संजय भापकर, अशोक भोसले, मधुकर बनकर, रत्नमाला हिरेमठ, रंजना भापकर, नीता इंगळे, शोभा बनकर, जयश्री धारे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी सुनील भोसले, बाळूमामा कोंडे यांचा ही सत्कार करण्यात आला.
           विद्यार्थ्यांनीही एकमेकांना आपला कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक परिचय करून दिला. ज्ञानेश्वर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्राची भोसले यांनी आभार मानले. नीलम भोसले, नागेश कोळेकर, विश्वाकुमार कदम यांनी मनोगत व्यक्त केले.  फटाक्यांच्या आतिषबाजीने शिक्षकांचे स्वागत करण्यात आले तसेच स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मेळाव्यासाठी अडीचशे किलोमीटरचा बसने प्रवास
स्नेहमेळाव्यासाठी अंबेजोगाई (जि. बीड) येथून मंजुश्री सपकाळ ही विद्यार्थिनी उन्हातान्हात तब्बल अडीचशे किलोमीटरचा प्रवास करून आली होती. तसेच काही विद्यार्थी मुंबई वरून प्रवास करून आले होते. 'माझ्या शालेय वयातल्या जिवलग मित्र मैत्रिणी आणि आदरणीय शिक्षक यांना भेटण्याच्या ओढीने आले' असे त्यांनी यावेळी सांगितले.
To Top