Baramati News l पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध असूनही मिळत नसल्याची चोपडजच्या भूमिहीन कुटुंबाची तक्रार : पंचायत समितीपुढे धरणे आंदोलन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पिण्याचे पाणी उपलब्ध असूनही मिळत नाही अशी तक्रार बारामती तालुक्यातील पांढरवस्ती (ता. बारामती) येथील भूमीहीन कुटुंबांकडून केली जात होती. मात्र याबाबत कुणी गांभीर्याने प्रश्न सोडवत नसल्याने अखेर धरणे आंदोलनाचा मार्ग अनुसरावा लागला. आज बारामती पंचायत समिती कार्यालयासमोर पिण्याच्या पाण्यासाठी व गरीबांना घरकुले मिळावीत यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केले गेले. अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.  
            बारामती तालुक्यातील चोपडजमधील पांढरवस्तीवर बहुसंख्येने वंचित व भूमिहिन कुटुंब राहतात. कालव्याशेजारी भरपूर पाणी असणाऱ्या विहीरीवरून पाणीयोजना राबविली असतानाही चोपडज ग्रामपंचायतीकडून पांढरवस्तीला दररोज अखंडीत पाणीपुरवठा करण्यात कसूर होत होती. वस्तीकरांचे पाण्यासाठी हाल होत होते. अनेक लोकांनी मुख्य पाईपलाईनला पाण्याचे जोड घेतले होते तर काहींना शेतातून पाणी मिळत होते. मात्र पांढरवस्तीच वंचित रहात होती. तक्रार केली की काही दिवस पाणी सोडले जायचे आणि पुन्हा बंद ठेवले जायचे. नीरा डावा कालव्याशेजारी विहीर पाडल्याने पाणीटंचाईचाही प्रश्न नव्हता. याबबात ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेविका, गटविकास अधिकारी यांना वारंवार मागणी करून, लेखी निवेदन करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता.
अखेर पाण्यासारख्या मूलभूत व संविधानिक हक्कापासून वंचित ठेवल्याबद्दल बसपाचे तालुकाध्यक्ष दयानंद पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर बेमुदत धरणे आंदोलन आज पार पडले. याशिवाय बेघर व भूमिहिनांना प्राधान्याने घरकुल मिळावे, घरकुलांसाठी सरकारी जागा उपलब्ध व्हावी, ग्रामपंचायतीकडून कागदपत्रांसाठी गरीबांची अडवणूक होऊ नये, सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवाव्यात अशाही मागण्या करण्यात आल्या. बसपाचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी, पुणे जिल्हा समितीचे चंद्रकांत खरात, रोहित लोंढे, शाम तेलंगे, बाळासाहेब पवार यांच्यासह ग्रामस्थ संजय गाडेकर, दत्तात्रय गायकवाड, गणपत माने, प्रशात नवले हे आंदोलनात सहभागी झाले. सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, तेजस जगताप यांनी आंदोलकांशी चर्चा केली. गटविकास अधिकारी यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याबद्दल लेखी आश्वासन दिल्यावर सकाळी दहाला सुरू झालेले आंदोलन साडेचार वाजता मागे घेण्यात आले.
याबाबत सहायक गटविकास अधिकारी नंदन जरांडे म्हणाले, पांढरवस्तीचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. तसेच मे अखेर पर्यंत घरकुल सर्व्हे सुरू असून तो  स्वतः करता येतो तसेच आमची यंत्रणा करत आहे. पात्र ग्रामस्थांनी अर्ज करावेत किंवा कार्यकर्त्यांनी यादी उपलब्ध करून दिली तरीही त्या प्रत्येकाचे आमच्या यंत्रणेकडून सर्वेक्षण केले जाईल.
            दयानंद पिसाळ म्हणाले, गेले अनेक महिने पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. तक्रार केली की दोन दिवस पाणी यायचे. पुन्हा बंद. याबाबत निवेदने दिली, तोंडी मागण्या केल्या. अखेर उपोषणाचा मार्ग आज निवडावा लागला. आजही गोरगरीबांना पिण्याच्या पाण्यासाठी भांडावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न कायमचा सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यांचे आभारी आहोत.
To Top