सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे -सातारा महामार्गावरील हरिचंद्री ता.भोर येथे बंद घराचे दार तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ६० हजार ८०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद अमोल रामराव कदम ( ग्रेस्टोन बिल्डिंग, हरिचंद्री, ता. भोर) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. २२ दुपारी अमोल कदम यांच्या राहत्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.यात सोन्याचे गंठण, कडे, अंगठ्या, लॉकेट-चेन, कानातील बाळ्या इत्यादी चीज वस्तूंचे चोरट्यांनी चोरी केली.सादर घटनेचा गुन्हा राजगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.