सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावरील सारोळे ता.भोर येथे रविवार दि. २९ रोजी मध्यरात्री चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. सारोळा - वीर रस्त्यावर असलेल्या ‘एस मार्ट’ या दुकानात दोन चोरट्यांनी घुसखोरी केली होती. मात्र दुकानात बसवलेल्या आधुनिक 'मोशन सेन्सर अलार्म'मुळे त्यांचा डाव उधळला गेला.
याबाबत अधिक माहिती अशी की रविवार मध्यरात्री २ चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा वाकवून आत प्रवेश केला. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते.मात्र आत शिरताच मोशन सेन्सर अलार्म सक्रिय झाल्याने जोरात सायरन वाजू लागला. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी चोरी न करता तात्काळ पळ काढला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व दुकानाचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे दिसून आले. त्यांच्या हालचाली आणि चेहऱ्याचे अंशतः चित्रणही फूटेजमध्ये स्पष्ट आहे.या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपासासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली असल्याचे मालकांकडून सांगण्यात आले.