सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोरगाव व परिसरात सध्या अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये कमी कष्टात जास्त पैसे कमाविण्याच्या आकर्षणात युवक पिढी गुरफटत चालली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चार चाकी गाडी, महागडा मोबाईल, सोशल मीडियाच्या आकर्षणामुळे व बेकायदेशीर व्यवसाया मध्ये गुरफटल्यामुळे या युवकांचे भविष्य अंधारात असून अनेक कुटुंब दिशाहीन होण्याच्या मार्गावर आहेत.
गेली अनेक वर्षांपासून मोरगाव सह बारामती तालुक्यात वाळूचे लिलाव झाले नाहीत. वाळू उपसा झाल्यानंतर नदी पात्रातील व त्या परिसरातील जलस्रोत घटत जाऊन पाण्याची पातळी कमी होईल व भविष्यकाळात पाण्याची टंचाई निर्माण होईल यामुळे ग्रामपंचायतीकडून व नागरिकांकडून ग्रामसभा मासिक सभा यामध्ये वाळू लिलावास परवानगी दिल्याचा ठराव दिला जात नाही. याउलट वाळू लिलावास बंदी असल्याचा ठराव केला जातो. मात्र वास्तविक त्या त्या भागातून वाळूचे लिलाव नसले तरी अनाधिकृत पणे वाळू उपसा सुरू आहे यामध्ये 20 ते 25 वयोगटातील युवक समूह करून गुरफटले असल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने या प्रकारावर पोलीस व महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
याशिवाय गौण खनिज मध्ये मुरूम व माती बेकायदेशीर उपसा करून विक्री करण्याचे प्रकार मोरगाव भागात सर्रास चालू आहेत.
मोरगाव पोलीस मदत केंद्राच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर बेकायदेशीरपणे दारू ,मटका, जुगार हे व्यवसाय चालू आहेत.
तीर्थक्षेत्र असल्यामुळे अनाधिकृत व चुकीच्या व्यवसायांमुळे गावातील वातावरण दूषित होत आहे मात्र तक्रार करणाऱ्यांची नावे प्रशासनाकडूनच संबंधित व्यवसायिकांना दिली जात असल्याने वादविवादाचे प्रकार यापूर्वी सातत्याने घडले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांमधून तक्रार करण्यास कोणी धजावत नसल्याची परिस्थिती आहे. तर स्थानिक पुढारी आपल्या पाठीमागे जनमत भक्कम राहिले पाहिजे यामुळे कोणालाच विरोध करत नसल्याचे वास्तव आहे.
वास्तविक, पूर्वी प्रशासकीय स्तरावरून ग्रामीण भागात वेगवेगळ्या घटनांवर जसा अंकुश ठेवला जात होता त्यामध्ये विस्कळीतपणा आला असून प्रत्येक गावातील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत चालले आहे.
यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोरगाव परिसरातील वस्तुस्थिती बद्दल निवेदन देणार असल्याची माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली.