सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील वनक्षेत्रामध्ये केले जाणाऱ्या वृक्षारोपणात सोमेश्वरनगर येथील आर.एन. शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडून मोलाचा वाटा उचलत वृक्षारोपणासाठी एक हजार झाडे देण्यात आली.
या वनविभागात लोकसभागातून पहिल्या टप्प्यात १० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. आज आर. एन. शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट कडून वृक्षरोपणासाठी एक हजार झाडे देण्यात आली.यावेळी वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, ट्रस्टचे सदस्य संजय शिंदे, संतोष शेंडकर, महेश जगताप, योगेश सोळस्कर, रामराजे सोसायटीचे मा. अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जेधे, राजू बडदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याने तब्बल वीस लाख लिटर क्षमतेचे तळे उभारले असून ठिबक सिंचन प्रणालीही उभारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर कारखाना, बारामती तालुका वनविभाग व ग्रामपंचायत वाघळवाडी यांनी संयुक्तपणे वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी कारखान्यापासून वनविभागाच्या हद्दीतपर्यंत दोन किलोमीटर पाईपलाईन करून कारखान्याने पाणी नेले आहे. ते पाणी साठविण्यासाठी कारखान्याने तब्बल वीस लाख लिटर क्षमतेचा साठवण तलाव तर उभारलाच शिवाय साठवण तलावातील पाण्यावर तब्बल सत्तर एकर क्षेत्रावर ठीबक सिंचन प्रणालीही जोडली आहे. वीजकंपनीद्वारे तलावावर ट्रान्स्फॉर्मरही नुकताच बसविण्यात आला. सत्तर एकर क्षेत्रावर सुमारे दहा हजार वृक्षांच्या रोपणासाठी कारखान्यानेच जेसीबीने व मजुरांकडून खड्डे करून घेतले आहेत.