सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७३ गट आणि १४६ गणांच्या रचनेचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आला. हवेली, जुन्नर, इंदापूर, खेड तालुक्यातील गट-गणांमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत.
हवेली तालुक्यात २०१७ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांची संख्या १३ होती, ती आता ६ वर आली आहे.
गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध झाल्याने ग्रामीण भागात कोणत्या गटात-गणात कोणते गाव आले आहे, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी करणे सुरू केले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गट-गण रचनेची अधिसूचना सोमवारी काढून ती जाहीर केली. २०११ ची जनगणना ग्राह्य धरून ही प्रारूप रचना करण्यात आली आहे. १३ तहसील कार्यालये, याबरोबरच पंचायत समिती कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप गट-गण रचनेवर २१ जुलैपर्यंत नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती, सूचना नोंदवता येणार आहेत.
या प्रारूप रचनेनुसार जुन्नर, खेड आणि इंदापूर या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेचे प्रत्येकी आठ सदस्य असणार आहेत. त्यामुळे ७३ पैकी २४ सदस्य या तीन तालुक्यांमध्ये असणार आहेत. तर सर्वात कमी म्हणजे २ जिल्हा परिषद सदस्य संख्या ही राजगड (वेल्हे) तालुक्यात असणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव हे नगरपंचायत अस्तित्वात असल्याने गट-गणात बदल झाल्याने अनेक गावे दुसऱ्या गट-गणात जोडली गेल्याने यावर हरकती नोदविल्या जाणार असल्याचे इच्छुकानी मत व्यक्त केले आहे.
------------------
लोकांची गैरसोय होणार ?
सध्याची गट आणि गणांची रचना पाहता यामध्ये लोकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ज्या त्या साखर कारखाना कार्यक्षेत्रातील गावे ज्या त्या ठिकाणी राहायला हवी होती. वास्तविक रचना करताना पूर्वेकडून-पश्चिम व दक्षिणेकडून उत्तरेकडे केली गेली पाहिजे. एकंदरीत नागरिकांना साखर कारखाना, महसूल व पोलीस ठाणे, दळण-वळण यांची गैरसोय होणार आहे.
करण खलाटे : मा. सभापती पंचायत समिती बारामती