Satara News l लग्नाचे आमिष..आणि विवस्त्र फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट...! पोलिसांनी आवळल्या एकाच्या मुसक्या, फलटण तालुक्यातील प्रकार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरेगाव : प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून तिची बदनामी केल्याप्रकरणी कवडेवाडी (ता. कोरेगाव) येथील करण प्रमोद आगम (वय २१) यास वाठार पोलिसांनी अटक केली आहे.
       याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, कवडेवाडी येथील करण आगम याने फलटण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला ६ नोव्हेंबर २०२४ ते १४ जुलै २०२५ पर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून स्वतःच्या, तसेच मित्राच्या घरी नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. यादरम्यानच्या काळात पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून पीडितेचे विवस्त्र फोटो काढले. मे २०२५ च्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संशयिताने स्वतःच्या घरात जबरदस्तीने पीडितेवर अत्याचार केला.
       सोमवारी दि. १४ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास संशयिताने पीडितेच्या आईला फोन करून शिवीगाळ केली व पीडित मुलीचे विवस्त्र फोटो इन्स्टाग्रामवर वायरल करण्याची धमकी दिली. या घटनेची फिर्याद पीडित मुलीने वाठार पोलिस ठाण्यात दिली आहे. वाठार पोलिसांनी संशयित करण आगम यास ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास कोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बल्लाळ करत आहेत.
To Top