Phaltan Breaking l अज्ञात वाहनाच्या धडकेत ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू : लोणंद-सातारा रस्त्यावरील सालपे नजीकची घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रशांत ढावरे
फलटण तालुक्यातील सालपे गावच्या हद्दीत लोणंद-सातारा रस्त्यावर रात्री उशिरा झालेल्या अपघातात ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विवेक विजय चव्हाण (रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ अक्षय औदुंबर चव्हाण (वय ३१) हा त्याची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो (MH 11 AX 4089) मोटारसायकलने लोणंदहून साताऱ्याकडे जात असताना सालपे गावच्या हद्दीत हॉटेल मल्हारजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अक्षय चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
लोणंद पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत. घटनास्थळी सपोनि सुशील भोसले यांनी भेट दिली असून, पोलीस वाहनाचा तपास घेत आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनाचे कोणतेही तपशील उपलब्ध नसल्यामुळे वाहन चालकाचा शोध सुरू आहे.
To Top