सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
हडपसर : प्रतिनिधी
शहराच्या फुरसुंगी परिसरात थार गाडीतून गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करत २६ किलो गांजासह थार गाडी जप्त केली असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अण्णा सुभाषराव (रा. प्रगती नगर काळेपडळ हडपसर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. फुरसुंगी येथील डी मार्ट परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, थार गाडीतून गांजाची तस्करी होणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली करत परिसरात सापळा रचला आणि संशयित गाडी थांबवून तपासणी केली. तपासणी दरम्यान, गाडीच्या आतून तब्बल २६ किलो गांजा सापडला. त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत २२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी थार गाडी जप्त करण्यात आली असून, आरोपीस ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.