Purandar Breaking l जमिनीचा वाद टोकाला गेला...! सख्ख्या भावानं ८३ वर्षाच्या भावाला संपवलं

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय. जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मावडी गावात सख्ख्या भावानेच आपल्या ८३ वर्षीय भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
      जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. १ ऑगस्ट रोजी मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय ८३) यांचा मृतदेह मावडी गावातील बाजरीच्या शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या मृत्यूमागे काहीतरी गूढ असल्याची शक्यता लक्षात घेता जेजुरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूला मारहाणीचे कारण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 
          तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मृत ज्ञानदेव भामे आणि त्यांचा सख्खा भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे (वय ६८) यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला की चांगदेव भामे यांनी अखेर संतापाच्या भरात आपल्या मोठ्या भावाचा खून केला. पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, जमिनीच्या वादातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे. आरोपीने मृताच्या डोक्यावर आणि अंगावर घाव घालून त्याचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनं मावडी गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून सख्या भावांनी हा टोकाचा पर्याय निवडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
To Top