सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध ऑनलाइन जुगार व्यवसाय करणाऱ्या चार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
बारामती तालुक्यातील
मरीमाता कलेक्शनजवळ मुर्टी परिसरात www.funrep.pro या लिंकच्या माध्यमातून मोबाईलवर आयडी आणि पासवर्ड पाठवून जुगार खेळवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संतोष रामदास रासकर (रा. करंजे रासकर मळा, ता. बारामती) व महेंद्र रामचंद्र मोरे (रा. मूर्ती, ता. बारामती) यांना ताब्यात घेतले.
सदर व्यक्तींच्या मोबाईलची तपासणी केली असता, ते funrep ॲप च्या माध्यमातून ऑनलाइन जुगार चालवत असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्यांनी आणखी दोन साथीदारांची नावे उघड केली. त्यामध्ये रोहित पवार (रा. वाणेवाडी, ता. बारामती) व विक्रम जाधव (रा. मोढवे, ता. बारामती) यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ₹१७,८५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात मोबाईल फोन व जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार अमोल भोसले करीत आहेत.
संपूर्ण कारवाई ही संदीपसिंह गिल्ल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग) सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. वारुळे, पोलीस हवालदार अमोल भोसले व एस. पी. देशमाने यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ऑनलाइन जुगारांवर अंकुशाची गरज
अलीकडच्या काळात मोबाईल ॲप्स व ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जुगाराचे प्रमाण वाढले आहे. युवक तसेच काही जण लालसेपोटी या जाळ्यात अडकत आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांची धडक कारवाई सुरू असली तरी समाजात याबाबत जागरूकता निर्माण होणेही गरजेचे असल्याचे सामाजिक क्षेत्रातून मत व्यक्त केले जात आहे.