Baramati Crime l शांततेचा भंग करणाऱ्या 'सुप्याच्या बकासुरावर' पोलिसांची कारवाई : वडगाव निंबाळकर पोलीसात एकावर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ गाव हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक दिलीप गोविंद सुतार यांनी दिली आहे.
      दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता  होळ गावच्या हद्दीतून वाणेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ ही घटना घडली. आरोपी दीपक लक्ष्मण भंडलकर (वय ३०, रा. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) याने आपल्याकडे असलेली टाटा कंपनीची 407 मॉडेलची गाडी (क्र. एमएच-43 एडी-1955) रस्त्यावर उभी करून त्यामध्ये बसविलेली जे.एम. पॉवर "सुप्याचा बकासुर" नावाची साऊंड सिस्टीम मोठ्या आवाजात बराच वेळ वाजवली. या दरम्यान परिसरात मोठा आवाज होत असल्याने नागरिक त्रस्त झाले. तसेच गाडी रस्त्यावर उभी राहिल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊन सार्वजनिक उपद्रव झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
        या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी गु.र.नं. 219/2025 अन्वये भा.दं.सं. कलम 223, 292, 285 व मुंबई पोलीस अधिनियम कलम 136 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार  चौधरी हे करीत आहेत.
To Top