सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
विनापरवाना बेकायदेशीर देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी पकडत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहनासह एकूण ११ लाख ११ हजार ३७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर निरा-बारामती रोडवरील निंबुत गावच्या हद्दीत सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयित पिकअप क्र. MH-11-DD-6926 थांबवून पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. वाहनातील इसमांची विचारपूस केली असता त्यांची नावे शुभम रामचंद्र होळकर (रा. रावडी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा) व सोमनाथ बाळासो पवार (रा. करंजेपुल, ता. बारामती, जि. पुणे) अशी समोर आली. दारू वाहतुकीबाबत कोणतेही परवाने किंवा आवश्यक कागदपत्रे न दाखवता आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. परिणामी, वाहन व दारूसह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख ११ हजार ३७५ रुपये एवढी आहे. सदर आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, आबा जाधव, सूरज धोत्रे, विलास ओमासे तसेच गृहरक्षक दलाचे सदस्य सहभागी झाले होते.