Rajgad l संग्राम दसवडकर जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम : विभागीय स्पर्धेसाठी निवड.. विंझर गावचा लौकिक वाढवला

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

राजगड : मिनल कांबळे

राजगड तालुक्यातील विंझर गावचा होनहार कुस्तीपटू संग्राम संतोष दसवडकर याने आपली दमदार खेळी दाखवत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर त्याची निवड आता विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली असून गावासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे पुणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत विविध वयोगटातील वजनी गटांत जिल्हाभरातील कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. त्यात संग्राम दसवडकरने १९ वर्षाखालील ७१ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला. संग्राम हा विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुलात सातत्याने सराव करतो. लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या संग्रामला वस्ताद राजाभाऊ लिम्हणअंकुश दसवडकरअनिकेत व्यवहारेकाळुराम जगतापचंदकांत चव्हाणविक्रम जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मेहनत, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे.

संग्राम हा माजी पंचायत समिती सदस्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांचा चिरंजीव आहे. घरातून मिळालेला पाठिंबा आणि सोबतच गावकऱ्यांचे प्रोत्साहन यामुळे तो सातत्याने पुढे जात आहे.

संग्रामच्या या यशानंतर त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, प्राचार्य भगवान बेल्हेकर, प्राचार्या तृप्ती शिळीमकर, क्रीडा शिक्षक दिपक कुवर यांच्यासह ग्रामस्थ व कुस्तीप्रेमींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.आता संग्राम दसवडकर विभागीय कुस्ती स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या खेळीने विभागीय तसेच राज्यस्तरावरही यश संपादन करून गावाचा मान उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

To Top