सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गडदरवाडी (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला असून याबाबत ग्रामस्थ सोपान सोमनाथ मदने यांनी माहिती अधिकार कायद्याखाली बारामती पंचायत समितीकडे अर्ज दाखल करून विविध कामांबाबत माहिती मागितली आहे. त्यांच्या अर्जावरून ग्रामपंचायतीतील काही कामकाजात गंभीर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा संशय मदने यांनी व्यक्त केला आहे.
मदने यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मागावलेल्या माहिती अर्जात म्हणटले आहे की, ३१ जानेवारी २०२३ रोजी ४ हजार ९०० रुपये मोटार काढणे व ४ हजार ९५० रुपये मोटार दुरुस्ती कामाचे बिलाबाबत व्यवहार संशयास्पद वाटत असून त्याबाबत चौकशी करून अहवाल व कागदपत्रांची माहिती द्यावी. तसेच दि. ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ४१ हजार ४०० रुपये रस्ता मुरुमी खर्च दाखवण्यात आला आहे. गावात सिमेंटरचे रस्ते असताना मुरुम कोठे टाकला याचा खुलासा व्हावा. दि. २४ मार्च २०२३ ला २ लाख ८८ हजार रुपयांचा गटार योजनेची मंजुरी संशयास्पद वाटत असून याबाबत खुलासा व्हावा. तसेच दि. २६ जुलै २०२३रोजी देखील काही मोठे व्यवहार झालेले असून त्याबाबत सविस्तर खुलासा व्हावा. दि २१ ऑगस्ट २०२३ रोजी विजेचे दिवे खरेदी दिसत नसुन मंजुरी कशी? दि. २४ जानेवारी २०२३ मागासवर्गीय १५ हातपंप दुरुस्ती त्याबाबत स्थानिक मागासवर्गीय यांचे जबाब घेणे व त्यांना दोन ते तीन वर्षात काय दिले खुलासा करावा. दि. २४ जानेवारी २०२४ ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाबाबत शंका असून काम कमी आणि पेमेंट ज्यादा अदा केलेले आहे याबाबतीत खुलासा व्हावा. आदी बाबतीत मदने यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवलेली आहे.