Baramati News l डॉ.संजय सावंत यांना राज्यस्तरीय मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार जाहीर : शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्था, बारामती यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय' मुक्ता-जगन्नाथ पुरस्कार' मुर्टी येथील डॉ.संजय मंगेश सावंत यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल जाहीर झाला आहे.
           मानपत्र, शाल, श्रीफळ व पंचवीस हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवारी दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता यशवंतराव मोरे आश्रमशाळा मुर्टी ता.बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
यापुर्वी हा पुरस्कार वनराईचे संस्थापक व माजी केंद्रीय मंत्री, मोहन धारिया, अनिंसचे नरेंद्र दाभोळकर, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, शेतकरी चळवळीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री गणपतराव देशमुख, व्यसन मुक्ती केंद्राचे संस्थापक ,लेखक अनिल अवचट, सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार गिरीश गांधी, इत्यादी मान्यवर व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात आला आहे  दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो. सन २०२५ चा हा पुरस्कार मुर्टी डॉ.संजय मंगेश सावंत यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जाहीर झाला आहे.
---------------
“पैसाअभावी रुग्ण परत जाणार नाही” या ध्येयाने काम करणाऱ्या डॉ. संजय सावंत

डॉ.सावंत यांनी वैद्यकीय क्षेत्रातील ( एम.डी . ) होमिओपॅथिक कन्सल्टंट उच्च पदवी घेऊनही बारामती, सासवड, पुणे हि शहरे जवळ असताना सुद्धा या ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू न करता आपल्या गावी मुटीॅ व परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर यांची गरज ओळखून अडचणीतील लोकांना माफक दरात वैद्यकीय सेवा लवकर मिळावी या हेतूने  40 वर्षापुर्वी प्रशांत क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.सामाजिक बांधिलकी व वैद्यकीय व्यवसाय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे गृहीत धरून सुरुवातीपासून वैद्यकीय व्यवसाय त्यांनी केला.पैसाअभावी कोणीही रुग्ण परत जाणार नाही हेच एकमेव ध्येय ठेवून कमीत कमी फी मध्ये म्हणजे फक्त शंभर रुपयांमध्ये पेशंट बरा झाला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.डॉ.सावंत हे मुर्टी  मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळेमध्ये शाळेच्या स्थापनेपासून  तेथील सर्व मुलांना मोफत वैद्यकीय उपचार व सल्ला देत आहेत.या शाळेतील हजारो मुलांना मोफत उपचार केले आहेत.मुर्टी व पंचक्रोशीतील सुमारे दीडशे गरीब व गरजू कुटुंबांना गेली तीस वर्षे मोफत वैद्यकीय उपचार देत आहेत.गेली 25 वर्ष सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी परिसरातून येणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार देत आहेत .या माध्यमातून आतापर्यंत सुमारे एक लाख रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत ही सेवा कोरोना काळात खंडित झाली होती परंतु आता ही सेवा पुन्हा चालू केली आहे 
 गेली नऊ वर्ष मूर्टी व परिसरातील 16 गावांमध्ये सुवर्णकन्या अभियान राबवित आहे या अभियाना अंतर्गत सदर सोळा गावांमधील ज्या दाम्पत्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे .त्या दाम्पत्यांच्या मुलीच्या नावावर प्रशांत क्लिनिकतर्फे पंधरा हजार रुपयांची ठेव ठेवली जाते तसेच ज्या दाम्पत्यांनी दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे अशा दांपत्यांच्या मुलीच्या नावावर दहा हजार रुपयांचे ठेव ठेवली जाते तसेच या सर्व मुलींना प्रशांत क्लीनिकतर्फे आजन्म मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाते तसेच या अभियानामध्ये बारामती लोणंद निरा जेजुरी या शहरांमधील सुमारे 20 तज्ञ डॉक्टरांकडून या मुलींना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात यामध्ये बाल रोग तज्ञ स्त्री रोग तज्ञ जनरल सर्जन फिजिशियन कान नाक घसा तज्ञ अस्थिरोग तज्ञ सोनोलॉजिस्ट मानसोपचार तज्ञ नेत्ररोग तज्ञ आयुर्वेद तज्ञ होमिओपॅथिक तज्ञ अशा सर्व शाखांमधील डॉक्टर सामील आहेत कोरोना काळात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद असल्यामुळे हे अभियान खंडित झाले होते. परंतु यावर्षीपासून हे अभियान पुन्हा चालू करण्यात येणार आहे.दैनिक सकाळ व इतर वृत्तपत्रातून वैद्यकीय व सामाजिक विषयावर सतत लेखन चालू असते .आतापर्यंत या विषयावर दैनिक सकाळ मध्ये सुमारे दीडशे लेख प्रसिद्ध झाले आहेत .तसेच वैद्यकीय व्यवसायातील अपप्रवृत्ती जसे की कट प्रॅक्टिस या विरोधात अनेक दैनिकांमधून लिखाण केले आहे तसेच या प्रवृत्ती पासून परावृत्त करण्यासाठी अनेक डॉक्टरांचे समुपदेशन केले आहे व त्यामध्ये बऱ्यापैकी यश आले आहे.वैद्यकीय व्यवसाय करीत असताना अगोदर रुग्ण नंतर कुटुंबीय व नंतर स्वतः आपण असाच प्राधान्यक्रम त्यांनी ठेवला आहे .सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ओपीडी रात्री अकरा पर्यंत चालते.बारामती तालुक्यात नव्हेतर पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात वाती सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना आपल्या औषधोपचाराने बरे केले आहे. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर यांच्यासाठी माफक दरात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देणारे व सामाजिक कार्याला वाहुन घेतलेले व अनेक संस्थांचे 'आदर्श डॉक्टर 'पुरस्काराने सन्मानित केलेले डॉ.संजय सावंत यांचे बारामती तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्हात आदराने नाव घेतले जाते.अशा या निष्णात डॉ.संजय सावंत यांना हा मानाचा राज्यस्तरीय 'मुक्ता -जगन्नाथ पुरस्कार 'जाहीर होत आहे.याबद्ल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.शनिवार दिनांक 27-सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा मुटिॅ मोढवे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होत आहे.तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक माजी आमदार ॲड विजयराव मोरे व संस्थेच्या अध्यक्षा सौ अलकाताई मोरे यांनी केले आहे.
To Top