Baramati News l तुमचं मन खरंच खूप मोठं आहे...अजितदादांकडून चिमुकल्यांचे कौतुक : मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी खाऊचे पैसे अजितदादांकडे केले सुपूर्त

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती पश्चिम भागातील करंजेपुल येथील दौऱ्यात एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. करंजेपुल ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी जात असताना राज्य सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले.  

       यावेळी त्यांच्या नातवंडांनी – नऊ वर्षांची राजनंदिनी व पाच वर्षांचा राजवीर मालेगावकर यांनी पाहुण्यांनी खाऊसाठी दिलेले व त्यांनी साठवून ठेवलेले तब्बल २ हजार ३०० रुपये मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून थेट अजितदादांकडे सुपूर्द केले. या प्रसंगी अजित पवार यांनी दोन्ही भावंडांचे मनापासून कौतुक करत “तुमचं मन खरंच मोठं आहे” असे म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले. 

        दरम्यान, किरण आळंदीकर हे सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी फोनवरून आवाहन करत असताना या चिमुकल्यांनी ते ऐकून, “आमच्याकडे खाऊसाठी जमवलेले पैसे आहेत, तेही आम्हाला मदतीसाठी द्यायचे आहेत” असे सांगितले. मुलांच्या या संवेदनशील भावनेमुळे कुटुंबीयांना अभिमान वाटला आणि त्यांनी स्वतःच त्यांना अजितदादांकडे घेऊन जाऊन ही मदत सुपूर्द केली. लहानग्यांची ही मदत आर्थिकदृष्ट्या लहान असली तरी त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


To Top