सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यासह पुरंदर व खंडाळा या तीन तालुक्यातील पाच वीटभट्टी मालकांना ( पुरंदर, खंडाळा, भोर) परराज्यातील टोळीने सुमारे १ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यामध्ये भोर तालुक्यातील चार वीटभट्टीमालकांचे प्रत्येकी २ लाख तर एकाच्या ३० हजार रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. शिवाजी शेडगे (रा. पिसावरे), प्रमोद कुंभार (उत्रौली), जीवन कुंभार (भोलावड़े), विनोक कुंभार(भोलाव़डे) आणि सुभाष खाटपे (वाठार हिमा) या चार वीटभट्टीधारकांची १२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
वीटभट्टीमालकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी खलीलअहमद नवाब पटेल (रा.कन्हेरी, ता. खंडाळा, जि.सातारा) याने उत्तरप्रदेशातील सलीम या ठेकेदाराची ओळख करून दिली.प्रत्येक वीटभट्टीवर कामगार देत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी एकत्र भेटून एका सिझनसाठी एका जोडप्याचे ४० हजार रुपये देण्याचे ठरले. चार वीटभट्टीमालकांना प्रत्येकी पाच जोडपी देण्याचे ठरले.या व्यवहाराचा नोटरी करारनामा केल्यानंतर सलीम याने उत्तर प्रदेशातील ठरावीक धर्माच्या काही जोडप्यांना काम करण्यासाठी आणले.त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी दोन मुकादमांचीही निवड करण्यात आली.दोन दिवसांनंतर सलीम आणि त्याच्या दोन्ही मुकादमांचा फोन बंद झाले.आलेल्या कामगारांनी मालकांकडे पैसे देण्याची मागणी केली. दरम्यान तालुका प्रशासनाकडे काही मजूरांना डांबून ठेवल्याची तक्रार झाली.त्यानंतर गाव कामगार तलाठी यांनी संबंधीत वीटभट्टीवर जाऊन मजूरांची खात्री केली.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वीटभट्टीमालकांनी गुरुवार दि.२५ भोर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि खालीलअहमद पटेल व सलीम त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व मजूरांना पोलिस ठाण्यात हजर करून चौकशी केली.मजूरांचीही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले.भोर तालुक्यासह पुरंदर, खंडाळा तालुक्यातील वीटभट्टीमालकांची मिळून १ कोटी ४२ लाख रुपयांची फरवणूक केली असल्याचे वीटभट्टीमालक शिवाजी शेडगे व प्रमोद कुंभार यांनी सांगितले.भोर पोलिसांनी संबंधीत घटनेचा तपास सुरु केला असून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.