सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
सोमेश्वरनगर परिसरातील आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘१०० बेडच्या आरोग्य पथका’साठी वाघळवाडीतील दहा एकर गायरान जागा देण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय पारित झाला असून प्रत्यक्ष इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महत्त्वपूर्ण निर्णय घेत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती याच्या अधिनस्त रु. ७७ कोटी ७९ लाख निधीचे १०० खाटांचे ‘आरोग्य पथक’ बाबत 'सोमेश्वर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत सांगून अवघ्या दोन दिवसात मंजूर करून त्यातील रु ६४ कोटीच्या इमारत बांधकाम मंजुरी दिली होती.
हे आरोग्य पथक कारखान्याच्या जागेत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते.परंतु कारखाना आणि शिक्षण संस्था यांना असलेली जागेची गरज आणि तांत्रिक अडचणींमुळे या पथकाच्या उभारणीसाठी मर्यादा येत होती. वाघळवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येत याबाबत ग्रामपंचायतीकडे सह्यांचे निवेदन दिले असता सरपंच अँड. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत एकमताने दहा एकर गायरान जागा देण्याचा ठराव पारित करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सरपंच अँड. हेमंत गायकवाड, उपसरपंच तुषार सकुंडे, ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार भोसले,सतिश सकुंडे,अजिंक्य सावंत, विजय सावंत,सदस्य गणेश जाधव ,जितेंद्र सकुंडे,अनिल शिंदे,प्रभाकर कांबळे,विशाल हंगिरे,अँड.अनंत सकुंडे,अजय सावंत आदी ग्रामस्थांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आरोग्य पथक स्थापन करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार पवार यांनी जागेची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार,अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तत्कालीन उपअभियंता रामसेवक मुखेकर व माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागेची पाहणी झाली. सर्व निकष पूर्ण असल्याची माहिती पवार यांना देण्यात आली आणि त्याच दिवशी पथक उभारणीस ग्रीन सिग्नल मिळाला होता.
वरिष्ठ स्तरावरील प्रशासकीय अधिका-यांची तसेच पवार यांच्या ऑफिस मधील अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे प्रस्तावास गती मिळाली. जागेबाबतचा प्रस्ताव प्रांतअधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे यांच्याकडे सादर केला होता. शंभर बेडचे आरोग्य पथक’ उभारण्यासाठी राज्य शासनाने वाघळवाडीतील दहा एकर गायरान जागेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने त्याचा शासन निर्णय पारित झाला असून जागा हस्तांतरीत होऊन प्रत्यक्ष इमारत उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
--------------------
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साडेचार कोटींचे प्राथमिक आरोग्य केंद्र तर तब्बल चौसष्ठ कोटींच्या शंभर बेडची अत्याधुनिक आरोग्य पथकाची भव्य उभारणी होणार असुन सार्वजनिक आरोग्य सेवेची पोकळी भरून निघणार असून ग्रामीण भागाला आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. या दोन सुबक व देखण्या वास्तू परिसराच्या वैभवात भर घालतील. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन काम सुरू होईल.
सरपंच अँड. हेमंत गायकवाड
