सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी-मळशी परिसरात बिबट्या शिरल्याची दाट शक्यता व्यक्त होत असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पशुधन बेपत्ता होण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि भीतीचे सावट पसरले आहे.
स्थानिक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये त्यांच्या समोर पाळीव कुत्रे बिबट्याने उचलून नेले असल्याचा दावा अमर जगताप आहे. तसेच शेतकरी योगेश भोसले यांच्या शेतातील मजुराने दोन पिल्ले व एक बिबट्याची मादी पहिल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप व शेतकरी अमर जगताप यांच्या दोन पाळीव कुत्र्यांचा गेल्या आठ दिवसांपासून काहीही मागमूस लागत नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय एका शेतमजुराची शेळी देखील गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. या सगळ्या घटनांचा मागोवा घेतल्यावर गावकऱ्यांमध्ये बिबट्या या परिसरात सक्रिय असल्याची शंका अधिकच बळावली आहे.
याबाबत वनविभागाला तातडीने या भागात शोधमोहीम राबवावी व पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी शेतात एकटे न जाणे, लहान मुले व पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, टॉर्चचा वापर करणे आदी सूचना ग्रामपंचायतीकडून दिल्या जात आहेत. या घडामोडीमुळे वाणेवाडी-मळशी परिसरातील शेतकऱ्यांची झोप उडाली असून, सर्वत्र बिबट्याच्या चर्चांना उधाण आले आहे.