सुपे परगणा l सुपे मंडलांतर्गत ५६ रस्त्यांचा प्रश्न लागला मार्गी : 3 हजार शेतकऱ्यांना होणार लाभ

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे मंडलांतर्गत सुपे, कुतवळवाडी, काळखैरेवाडी, वढाणे आणि पानसरेवाडी या पाच गावातील नकाशावर असलेले आणि नवीन शेत रस्ते असे सुमारे ५६ रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे ३ हजार २०४ शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती सुप्याचे मंडलाधिकारी हंसध्वज मनाळे यांनी दिली. तर हे अभियान राहिलेल्या सात गावात राबाविणार असून काही यातुन वंचित राहिले असतील त्यांनी त्वरीत संपर्क साधण्याचे आवाहन मनाळे यांनी केले आहे.
         छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती याचे औचित्य साधून शिवारफेरीचे आयोजन केले आहे. 
     त्यानुसार शिव, पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे. शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे. उपलब्द असलेल्या किंवा नसलेल्या रस्त्यांची नोंद घेणे. शेत रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे. तसेच नवीन रस्त्यांची यादी ग्रामसभेत मंजूर करून ती भूमी अभिलेख यांना मोजणी करून सिमांकनसाठी देणे आदी कामे यावेळी करण्यात येत आहेत. 
        येथील पांढरीचा मळा रस्त्याची माहिती घेण्यासाठी मंडलाधिकारी मनाळे यांच्यासह सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, अशोक लोणकर उपस्थित होते. यावेळी सुप्यातील १२ रस्त्यांसाठी शेतकरी संमती देण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचा विषय ग्रामसभेत मंजूर करून पुढे भूमिअभिलेख विभागाकडे सीमांकनासाठी पाठवण्यात येणार असल्याचे सरपंच तुषार हिरवे यांनी सांगितले. त्यामुळे या १२ रस्त्यामुळे सुमारे नऊशे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 
          बारामतीचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांच्या सीमांकनाचे काम येथील महसूल विभागाकडून सुरू केले आहे. यावेळी ग्राममहसूल अधिकारी नीलेश गद्रे, राहुल केंद्रे, आशितोष पाटील, अनिता धापटे, नीलम देशमुख आदींसह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी यासाठी शिवार फेरीच्या माध्यमातून रस्त्यांची माहिती व नोंद घेत आहेत. 
       तसेच पुढील चार दिवसात नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, चांदगुडेवाडी, खंडूखैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतळवाडी या गावांमध्ये शिवार फेरी आयोजित केली आहे. या अभियान दरम्यान मंडल कार्यालयाचे सुशोभीकरण, कार्यालय फालकाचे नाव, वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर चावडी वाचन बुधवारी ( दि.१७ ) करण्यात येणार असल्याचे मनाळे यांनी सांगितले.
          ....................................

To Top