Bhor News l माळरानावर चरत असलेल्या जनावरांवर विजेच्या तारा तुटून पडल्या : विजेच्या धक्क्याने एक म्हैस दगावली

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील पोंबर्डी – वेनवडी गावांच्या हद्दीवरील माळरानावर शनिवारी (दि.१३ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत वेनवडी येथील शेतकरी सोपान रामचंद्र चव्हाण यांच्या घाबन म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सोपान चव्हाण हे आपली चार ते पाच जनावरे खाजगी मोकळ्या माळरानावर चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचवेळी जोरदार वारे व पाऊस सुरू झाला. अचानक महावितरणची वीजवाहक तार तुटून जनावरे चरत असलेल्या ठिकाणी जमिनीवर कोसळली. दुर्दैवाने या तारेला स्पर्श झाल्याने चव्हाण यांच्या घाबन म्हशीला जोरदार विजेचा धक्का बसला आणि ती जागेवरच कोसळून दगावली.

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रवीण गायकवाड व वायरमन प्रकाश चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यातील तपशील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून, शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, शेतकरी संघटनेकडून तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत व योग्य ती भरपाई मिळावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

To Top